गडचिरोलीत ‘हर घर जोडो’ अभियानातून शेकाप करणार सभासद नोंदणी

शहरात प्रत्येक वार्डात शाखा काढणार

गडचिरोली : शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्या जयश्री जराते यांच्या नेतृत्वात गडचिरोली शहरातील प्रत्येक वाॅर्डात पक्ष शाखांची स्थापना करण्यात येणार आहे. त्यासाठी १३ ते २७ फेब्रुवारीदरम्यान हर घर जोडो अभियान राबविणार आहे. या अभियानाअंतर्गत विद्यार्थी, युवक, महिला व पुरुषांना पक्षाशी जोडण्यासाठी पक्ष सभासद नोंदणी करण्यात येणार असल्याचे शेकापच्या वतीने प्रसिद्धी पत्रकातून कळविण्यात आले.

या पत्रकात नमुद केल्यानुसार, सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या सरकारने ५ किलो मोफत रेशन दिल्याचा आणि देशात २५ कोटी जनतेला गरिबीतून मुक्त केल्याचा दावा अर्थसंकल्पीय अधिवेशनात केला आहे. हा खोटारडेपणा देशातील सर्वसामान्य गरीब, कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेतमजूर, महिला, विद्यार्थी, युवक, बेरोजगार, छोटे दुकानदार, नोकरदारांची गळचेपी करणारा आहे. शेतीमालाला योग्य हमीभाव, आरोग्य, शिक्षणावरील कमी केलेली तरतूद, गरिबांना आणखी गरिबीच्या खाईत लोटणार आहे.

या अराजकतेविरुद्ध देशातील प्रमुख विरोधी असलेला काँग्रेस पक्ष जनतेसोबत लढा उभारायचा सोडून ईडी-सीबीआयच्या धाकाने मिळमिळीत भूमिका घेऊन शांत बसलेला आहे. शिवसेना-राष्ट्रवादी यांनाही पक्ष फुटीने ग्रासलेले आहे. जनतेच्या प्रश्नांपेक्षा स्वतःच्या अस्तित्वाच्या संघर्षात ते गुरफटले आहे. देशापातळीवरील या परिस्थितीमुळे गडचिरोली शहरातही त्याची झळ बसणार आहे.

शहरातील फुटपाथ दुकाने, घरकुल, अतिक्रमणे कायम करून प्रॉपर्टी कार्ड मिळणे, रस्ते, नाल्या, पिण्याच्या पाण्याची सोय यासारख्या समस्यांचे निवारण करण्यासाठी शेकापच्या प्रत्येक वार्डात शाखा उघडण्यासाठी मोठ्या संख्येने सभासद होऊन एकत्र यावे, असे आवाहन जिल्हा चिटणीस रामदास जराते, खजिनदार शामसुंदर उराडे, महिला नेत्या जयश्री जराते, युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष भाई अक्षय कोसनकर, जिल्हा समितीचे सदस्य डॉ.गुरुदास सेमस्कर, रेश्मा रामटेके, विजया मेश्राम, छाया भोयर, रजनी खैरे, शुल्का बोबाटे, संगिता बोदलकर, अस्मिता लाटकर, धारा बन्सोड, कुसूम नैताम, पुष्पा कोतवालीवाले, योगेश चापले, भीमदेव मानकर, राजकुमार प्रधान, बाबुलाल रामटेके, विनोद उराडे, अंकुश मारभते, भूषण चिंचोलकर यांनी केले आहे.