अखेर रेगुंठात दाखल झाली महामंडळाची एसटी बस, नागरिकांना मिळाला दिलासा

भाग्यश्री आत्राम यांचा पुढाकार

एसटी बसच्या चालक-वाहकाचे स्वागत करताना गावकरी

सिरोंचा : तालुक्यातील अतिदुर्गम रेगुंठा आणि टेकडा परिसरात मागील अनेक दिवसांपासून एसटी महामंडळाची बससेवा बंद असल्याने या परिसरातील नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. दरम्यान नागरिकांची अडचण लक्षात घेता माजी जि. प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांनी अहेरी आगार प्रमुखांकडे या गावांसाठी एसटी बस सुरू करण्याची मागणी केली होती. त्यासाठी त्यांनी अहेरी आगारात प्रत्यक्ष भेट देऊन निवेदनही दिले होते. अखेर सिरोंचा-तेकडा-रेगुंठा-अहेरी बस सुरू करण्यात आली असून या परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

अहेरी आणि सिरोंचा तालुक्यातील देवलमरी, आवलमरी, लंकाचेन, मोयाबिनपेठा, रेगुंठा, पर्सेवाडा, तेकडा, कंबालपेठा या गावांतील नागरिकांना तालुका मुख्यालयी जाण्यासाठी खाजगी वाहनाचा आधार घ्यावा लागत होता. मागील अनेक दिवसांपासून या परिसरातील नागरिकांकडून एसटी बसची मागणी केली जात होती. यासाठी भाग्यश्री आत्राम यांनी आगार व्यवस्थापक यांच्याकडे मागणी केल्यानंतर अहेरी आगार प्रमुखांनी अहेरी ते सिरोंचासाठी बस सुरू केली.

8 फेब्रुवारी रोजी एसटी बस गावात दाखल होताच परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एसटी बस आणि वाहन चालक व वाहकाचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. ही बस अहेरी आगारातून सायंकाळी 5 वाजता देवलमरीमार्गे रेगुंठा-तेकडा-कंबालपेठा मार्गे सिरोंचाकडे जाते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजून 50 मिनिटांनी सिरोंचावरून याच मार्गे अहेरीकडे येते. परिसरातील नागरिकांच्या मागणीनुसार एसटी बस दाखल झाल्याने नागरिकांनी भाग्यश्री आत्राम यांचे आभार मानले.