गडचिरोली : अहेरी नगर पंचायतमधील सत्ताधारी 9 नगरसेवकांनी एका अवैध अतिक्रमणाला संरक्षण देणारा ठराव बहुमताच्या आधारे पारीत केला आहे. त्याविरोधात भाजपकडून तक्रार नोंदविण्यात आली होती. पण त्या प्रकरणात गेल्या दोन वर्षांपासून सुनावणीच झाली नाही. त्यामुळे त्या प्रकरणाची सुनावणी तातडीने घेऊन त्या 9 नगरसेवकांना अपात्र करा, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसणार, असा इशारा भाजपच्या नगरसेवकांनी जिल्हाधिकारी संजय दैने यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
अहेरी नगर पंचायतमध्ये कित्येक निविदा प्रक्रिया अशीच बेकायदेशीरपणे राबविण्यात येत आहे. त्यामुळे सर्व निविदा प्रक्रियांची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. लवकर न्याय न मिळाल्यास येत्या 5 आॅगस्ट 2024 पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण केले जाणार आहे.