गडचिरोली : मागास गडचिरोली जिल्ह्याच्या उत्थानासाठी या जिल्ह्यात भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांची फौज सेवा देणार आहे. सद्यस्थितीत 4 आयएएस अधिकारी कार्यरत आहेत. आता त्यात आणखी 3 आयएएस अधिकाऱ्यांची भर पडणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण आयएएस अधिकाऱ्यांची संख्या 7 होणार आहे.
नव्याने रुजू होणार असलेल्या तीन अधिकाऱ्यांमध्ये एटापल्लीचे एसडीओ तथा भामरागडचे प्रकल्प अधिकारी म्हणून नमन गोयल, कुरखेडाचे एसडीओ म्हणून रंजित मोहन यादव, तर चामोर्शीचे एसडीओ म्हणून अमित रंजन यांची बदली करण्यात आली आहे. ते तीनही अधिकारी आयएएस आहेत.
सध्या जिल्हाधिकारी संजय दैने, जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह, गडचिरोलीचे एसडीओ तथा सहायक जिल्हाधिकारी राहुलकुमार मीना आणि अहेरीचे एसडीओ जीवने हे आयएएस अधिकारी कार्यरत आहेत.