चांदाफोर्ट-वडसा-गोंदिया पॅसेंजर गाडी आजपासून पुन्हा रेल्वे प्रवाशांच्या सेवेत

कोरोनाकाळात केली होती बंद

गडचिरोली : कोरोना महामारीमुळे बल्लारशहा-गोंदिया रेल्वे मार्गांवरील अनेक गाड्या बंद करण्यात आल्या होत्या. कोरोना जाऊन दोन वर्षापेक्षा अधिक काळ लोटला असला तरी त्या रेल्वेगाड्या सुरु करण्यात आल्या नसल्याने हजारो रेल्वे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत होता. अखेर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी केलेल्या प्रयत्नांमुळे या मार्गावरील पॅसेंजर गाडी रविवारपासून (दि.8) पुन्हा सुरू होत आहे. नवनियुक्त खासदार डॉ.नामदेव किरसान यांच्या हस्ते वडसा रेल्वे स्थानकावर या गाडीला हिरवा झेंडा दाखविला जाणार आहे.

संसदेच्या पहिल्याच अधिवेशनात खा.डॅा.किरसान यांनी वडसा-चांदाफोर्ट, चांदाफोर्ड-गोंदिया रेल्वे पूर्ववत सुरु करण्याची मागणी केली होती. याशिवाय आमदार कृष्णा गजबे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना दि.17 जुलै 2024 रोजी निवेदनाद्वारे वडसा ते चांदाफोर्ट मेमू पॅसेंजर गाडीसह, गोंदिया ते वडसा व चांदाफोर्ट ते गोंदिया या वडसा रेल्वे स्टेशनवरून ये-जा करणाऱ्या मेमू पॅसेंजर रेल्वेगाड्या सुरू करण्याची विनंती केली होती. अश्विनी वैष्णव हे महाराष्ट्र राज्याचे भाजपा निवडणूक प्रभारी असल्याने नुकत्याच पुणे येथे झालेल्या भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीतही त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन वर नमूद रेल्वे गाड्या पुर्ववत सुरू करण्याची विनंती आ.गजबे यांनी केली होती.

रेल्वे विभागाने सकारात्मक कार्यवाही करुन प्रधान मुख्य व्यवस्थापक (परिचालन), द.पु.म.रे. बिलासपूर यांच्या कार्यालयाने काढलेल्या आदेशानुसार बंद करण्यात आलेल्या रेल्वेगाड्या पुर्ववत सुरू करण्याची घोषणा केली आहे.

रेल्वे विभागाने बंद केलेल्या गाड्या पुर्ववत सुरू करुन उद्योगनगरी वडसा शहरासह संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा दिल्याबद्दल आ.गजबे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री वैष्णव यांचे आभार मानले.