गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याच्या ग्रामीण आणि दुर्गम भागात सुशिक्षितपणाच्या अभावामुळे असलेली अंधश्रद्धा लोकांच्या जीवावर उठत आहे. अहेरी तालुक्यात चार दिवसांपूर्वी दोन बालकांना यातूनच जीव गमवावा लागला. त्यामुळे प्रशासनाने या भागात लोकजागर मोहीम हाती घेतली. दुर्गम भागातील नागरिकांमध्ये जनजागृती करून त्यांना आरोग्य केंद्रातच उपचार घेण्याची शपथ देण्यात आली. यावेळी अपर जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी एका आरोग्य सेविकेला बोलते केल्यानंतर तिने सांगितलेली वास्तविक परिस्थिती डोकं सुन्न करणारी होती.
आई-वडीलांसह अनेक वेळा त्यांचे आजी-आजोबाही कामावर जातात. त्यामुळे मुले तशीच घरी खेळत राहतात. लोक मुलांच्या लसिकरणालाही नकार देतात. शिव्या देतात. इतरांचे सोडा, चक्क गरोदर महिलासुद्धा दारू पिऊन असते, अशी माहिती आरोग्य सेविकेने दिली. अशीच परिस्थिती राहिली तर पुढील पिढी कशी सुदृढ होणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
जनसामान्यात असलेल्या अंधश्रद्धा व तातडीच्या वैद्यकीय उपचाराविषयीची अनास्था याबाबत जनजागृतीची निकड लक्षात घेऊन अपर जिल्हाधिकारी भाकरे यांनी जिल्हा प्रशासनामार्फत अभिनव लोकजागर मोहीम राबविली. नक्षलग्रस्त व अतिदुर्गम भागात असलेल्या येर्रागड्डा येथे प्रत्यक्ष जाऊन मृत्यू पावलेल्या मुलांच्या आई-वडिलांची भेट घेतली. त्यांची सांत्वना, घडलेल्या दुर्दैवी घटनेविषयी चौकशी करून दुःख ओढवलेल्या दाम्पत्याच्या उपस्थितीत गावकऱ्यांसोबत संवाद साधला. अंधश्रद्धा निर्मूलनासाठी माडिया व तेलगू भाषेत शपथ देण्यात आली. जिमलगट्टा येथे परिसरातील सर्व आशा वर्कर, ग्रामसेवक, तलाठी, मंडळ अधिकारी, कोतवाल, प्राथमिक आरोग्य केंद्राचे आणि उपकेंद्राचे वैद्यकीय अधिकारी, अहेरीचे गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, परिसरातील गावांचे उपसरपंच आणि मोठ्या संख्येने नागरिक, युवक आणि विद्यार्थी उपस्थित होते. अंधश्रद्धा निर्मुलनाबाबत तेलुगू व माडिया भाषेत संवाद साधण्यात आला.
यावेळी सर्वांना अंधश्रद्धा निर्मूलनाची शपथ देण्यात आली. उपस्थित गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन शासनातर्फे राबविण्यात येत असलेल्या योजनांच्या बाबतीत असलेले ज्ञान, सामान्य जनतेला प्रत्यक्ष मिळालेले लाभ आणि त्यांच्या अडचणी जाणून घेऊन समस्यांचे निराकरण करण्याचे निर्देश संबंधित शासकीय यंत्रणेला देण्यात आले. आरोग्य यंत्रणेमार्फत आरोग्य सेवा पुरवण्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आणि अशा दुर्गम भागात सेवा देण्यासाठी त्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र जिमलगट्टा, उपकेंद्र गोविंदपूर येथे वैद्यकीय अधिकारी आणि रुग्णांशी संवाद साधण्यात आला. लोकजागराचे पोस्टर्स गावामध्ये लावण्याची कार्यवाही करून अंधश्रद्धा निर्मूलनासाठी आणि गावाचे विकासदूत बनण्यासाठी स्थानिकांना, विशेषतः युवकांना आवाहन करण्यात आले.
गावकऱ्यांना दिली जात आहे अशी शपथ
“माझे जीवन अमूल्य आहे. तसेच माझ्या परिवारातील, समाजातील आणि या देशातील सर्वांचे जीवन अमूल्य असून तोच विकासाचा आधारबिंदू आहे, याची मला जाणीव झाली आहे. यापुढे मला किंवा इतरांना कोणत्याही प्रकारचा आजार झाल्यास मी तात्काळ नजीकच्या दवाखान्यामध्ये जाऊन उपचार घेईल. पुजारी, गावठी वैदू यांच्यावर विश्वास ठेवल्यास जीवन धोक्यात येऊ शकते, याची मला पूर्णपणे जाणीव झाली आहे. यापुढे मी अंधश्रद्धेवर विश्वास ठेवणार नाही, अशी मी ईश्वर साक्षीने शपथ घेत आहे… जय सेवा….”
जिमलगट्टातील नागरिकांनी केली ही मागणी
अपर जिल्हाधिकारी भाकरे यांनी शनिवारी, गणेश चतुर्थीच्या दिवशी आपल्या चमुसह जिमलगट्टा प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली. या आरोग्य केंद्राअंतर्गत परिसरातील जवळपास 20 गावे आहेत. पण आरोग्य केंद्रात एमबीबीएस आणि एमडी डॅाक्टरची सुविधा नसल्याने नागरिकांना वेळेवर उपचार मिळत नसल्याची तक्रार गावकऱ्यांनी केली. याशिवाय रुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध नसल्याने परिसरातील नागरिकांना बैलंबडी किंवा दुचाकीने उपचारासाठी आणावे लागते. त्यामुळे येथे 108 रुग्णवाहिकेची सोय उपलब्ध करुन देण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली.