१२ तास वीज पुरवठा देऊन आमच्या पिकांना वाचवा हो, शेतकऱ्यांचा टाहो

एसडीओ ऑफिससमोर सुरू केले उपोषण

देसाईगंज : शेतकऱ्यांच्या रबी पिकांना सुरळीत पाणी पुरवठा व्हावा यासाठी उर्जामंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषी पंपांना १२ तास वीज पुरवठा देण्याचे आश्वासन दिले. पण ते अद्याप पूर्ण झाले नसल्याने तालुक्यातील कृषी पंपधारकांनी रामदास मसराम यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे आहे. तीन दिवस झाले तरी बुधवारी हे उपोषण कायम होते.

शेतकऱ्यांच्या वीज पुरवठ्याच्या समस्येबाबत आ.कृष्णा गजबे यांनी ना.फडणवीस यांच्याशी चर्चा करुन ३ दिवसात आरमोरी विधानसभा क्षेत्रासह जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुरळीत वीज पुरवठा केला जाईल, अशी ग्वाही दिली होती. परंतु १५ दिवस उलटूनही वीज पुरवठा सुरळीत होत नसल्याने पिक धोक्यात आले आहे. त्यामुळे वीज पुरवठा पूर्वीप्रमाणे १२ तास द्यावा यासाठी शेतकऱ्यांनी मसराम यांच्या नेतृत्वात उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढून उपोषणाला सुरुवात केली. यात बुधवारी कोरेगावचे शेतकरी श्याम मस्के पाटील यांनी आमरण उपोषणाची तयारी दर्शवली.

याप्रसंगी विलास बन्सोड, लिलाधर पर्वते, कमलेश बारस्कर, शुभम नागपूरकर, परशुराम ठाकरे, प्रमोद पत्रे, दिनेश बेद्रे, हिराजी बुल्ले, विवेक केळझरकर, गरीबदास बाटबर्वे, महेश भरणे, होमराज डोंगरवार, होमराज गायकवाड यांच्यासह मोठ्या प्रमाणावर शेतकरी उपस्थित होते.