प्रकृती धोक्यात, पण प्रसुतीसाठी जाण्यास ‘ती’ देत होती नकार

आरोग्य विभागाने वाचवला जीव

गडचिरोली : प्रसुतीची अंतिम तारीख उलटली, अंगावर सूज आली, तरीही रुग्णालयात जाण्यास नकार देणाऱ्या दुर्गम भागातील महिलेला अखेर प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या अथक प्रयत्नानंतर रुग्णालयात हलविण्यात यश आले. एटापल्ली तालुक्यातील वाडसकला येथील 22 वर्षीय वीणा वासुदेव पोटवी या महिलेची अखेर रुग्णालयात सुरक्षित प्रसुती झाली. यामुळे तिच्यासह बाळाचाही जीव वाचवण्यात प्रशासनाला यश आले. (सविस्तर बातमी खाली वाचा)

वीणा पोटवी यांची प्रसुतीची अपेक्षित तारीख 21 मे 2025 होती. त्या उपचारासाठी प्राथमिक आरोग्य पथक जारावंडी येथे येण्यास तयार नव्हत्या. त्यामुळे मागील एक महिन्यापासून ’90-42 दिवस मिशन’ अंतर्गत जारावंडीचे वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रशिल घोनमोडे आणि आशा सेविका मीना आतला त्यांच्या घरी जाऊन नियमित तपासणी करत होत्या. 15 मे 2025 पासून आरोग्य सेविका सुनंदा आतला आणि आशा सेविका मीना आतला यांनी दररोज त्यांच्या घरी जाऊन आरोग्य सेवा दिली.

डॉ.घोनमोडे यांनीही तपासणी केली, परंतु गरोदर महिला आणि त्यांच्या कुटुंबियांनी रुग्णालयात येण्यास स्पष्ट नकार दिला होता. यादरम्यान मागील 5-6 दिवसांपासून गरोदर मातेच्या पायावर आणि चेहऱ्यावर सूज वाढली होती, तसेच रक्तदाबही वाढत होता. यामुळे माता आणि बाळाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकत होता. ही गंभीर परिस्थिती माता आणि तिच्या नातेवाईकांना समजावून सांगून रुग्णालयात नेणे गरजेचे असल्याचे सांगितले. पण त्यांनी रुग्णालयात येण्यास नकार दिला.

अखेर प्रशासनाने घेतली धाव

26 मे 2025 रोजी डॉ.प्रशिल घोनमोडे, ज्ञानेश्वर गिरहे (समुदाय आरोग्य अधिकारी, भापडा) आणि आरोग्य सेविका सुनंदा आतला यांनी पुन्हा एकदा ’90-42 दिवस मिशन’ अंतर्गत घरी जाऊन तपासणी केली असता, मातेच्या चेहऱ्यावरील आणि पायांवरील सूज तसेच रक्तदाब लक्षणीय वाढलेला दिसला. डॉ.घोनमोडे यांनी ही माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.भूषण चौधरी यांच्या निदर्शनास आणली. डॉ.चौधरी यांनी तात्काळ उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी नमन गोयल, तहसीलदार हेमंत गांगुर्डे, उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश पांडे आणि गटविकास अधिकारी आदिनाथ आंधळे यांच्याशी संपर्क साधून जारावंडी पोलीस स्टेशनमधून मदत मिळवली.

पोलीस आणि महसूल विभागाची साथ

जारावंडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मोहिते, पोलीस उपनिरीक्षक श्रीमती चव्हाण, श्रीमती इंगोले, एस.बी. तेलामी आणि सोपान उईके (महसूल सेवक) यांनी तातडीने त्या गरोदर महिलेच्या घरी जाऊन तिची समजूत घातली. त्यानंतर त्या महिलेला प्राथमिक आरोग्य पथक जारावंडी येथे आणले आणि कुटुंबीयांना आर्थिक मदतही केली.

पुढील उपचार आणि शासनाच्या योजना

प्राथमिक आरोग्य पथक जारावंडी येथे महिलेची तपासणी करून प्राथमिक उपचार दिल्यानंतर, पुढील उपचारासाठी तिला जिल्हा महिला रुग्णालय गडचिरोली येथे हलवण्यात आले. महाराष्ट्र शासन आणि जिल्हा परिषद आरोग्य विभाग ‘100 टक्के संस्थात्मक प्रसूती’साठी प्रयत्नशील आहे. गरोदर मातांना जननी सुरक्षा योजना, प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना, मानव विकास कार्यक्रमाअंतर्गत बुडीत मजुरी योजना यांसारख्या विविध योजनांचा लाभ मिळावा यासाठी विशेष लक्ष दिले जात आहे.