किशोरवयीन मुलींच्या प्रशिक्षणाला जिल्हा कार्यक्रम अधिकाऱ्यांची भेट

आरोग्यविषयक केले मार्गदर्शन

गडचिरोली : जिल्ह्यात कैवल्य एज्युकेशन फाउंडेशनमार्फत 14 ते 18 वयोगटातील किशोरवयीन मुलींसाठी व्यावसायिक प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे. या प्रशिक्षण केंद्राला बुधवारी महिला व बालविकास विभागाच्या जिल्हा कार्यक्रम अधिकारी अर्चना इंगोले आणि बालविकास प्रकल्प अधिकारी सिंधु गाडगे यांनी भेट दिली.

या भेटीदरम्यान प्रशिक्षण घेणाऱ्या मुलींनी आपले अनुभव सांगितले. यावेळी त्यांना अभ्यासविषयक पुस्तके व साहित्याचे वितरण करण्यात आले. कैवल्य एजुकेशन फाउंडेशनमार्फत गडचिरोली तालुक्यातील 150 मुलींना हे प्रशिक्षण दिल्या जात आहे.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला कैवल्य एज्युकेशन फाउंडेशनचे कार्यक्रम व्यवस्थापक महेश धांडोळे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी राहुल बारचे, गायत्री गोतमारे, नेक्सटेकचे निकेश फुलझले आणि करुणा फेलो प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन अविनाश कंजे यांनी केले.

किशोरवयीन मुलींना आरोग्यविषयक मार्गदर्शन

कैवल्य एज्युकेशन फाउंडेशनच्या कार्यालयामध्ये आयोजित संगणक प्रशिक्षण शिबिरात बालविकास प्रकल्प अधिकारी सिंधू गाडगे आणि पर्यवेक्षक ललिता झरकर यांनी किशोरवयीन मुलींना मासिक पाळी, संतुलित आहार, स्वच्छता आणि आरोग्याबद्दल मार्गदर्शन केले. त्यांनी मुलींना स्वच्छता राखण्याची, सॅनिटरी पॅड्स वेळेवर बदलण्याची आणि कोणतीही समस्या असल्यास आई किंवा अंगणवाडी सेविकेची मदत घेण्याची सूचना केली. मासिक पाळीबाबतचे गैरसमज दूर करून, योग्य माहिती देण्यावर त्यांनी भर दिला.