शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी बसेस वेळेवर सोडा

अजय कंकडालवार यांची एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा

अहेरी आगाराच्या प्रमुखांशी चर्चा करताना अजय कंकडालवार

अहेरी : तालुक्यातील आलापल्ली ते आष्टी रस्त्यावर वसलेल्या खमनचेरू, बोरी, राजपूर, शिवनीपाठ, जामगाव, टिकेपली, धन्नूर, धमपूर, चौडमपली, चंदनकेळी आदि गावांमध्ये बस सेवा विस्कळीत झाल्याने शालेय विद्यार्थ्यांना व नागरिकांना शाळेत पोहोचण्यासाठी उशिर होत आहे. यातून त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. हे टाळण्यासाठी योग्य तो तोडगाा काढून बसगाड्या वेळेवर सोडा, अशी मागणी माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे सभापती अजय कंकडालवार यांनी एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून केली.

त्यांनी अहेरी आगाराचे प्रमुख घागरगुंडे यांची भेट घेतली. त्यांनी आम्ही बसेस वेळेवर सोडतो, परंतु रस्त्यांवर उभ्या राहणाऱ्या जड वाहनांमुळे बसेस वेळेवर पोहोचू शकत नाही असे सांगितले. यावेळी कंकडालवार यांनी विभागीय नियंत्रक व विभागीय वाहतूक अधिकारी यांच्यासोबत भ्रमणध्वनीवरून संपर्क करून यावर त्वरित तोडगा काढा, अशा सूचना केल्या.

यावेळी अहेरीचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, नरेंद्र गर्गम, प्रकाश दुर्गे, विनोद रामटेके, राकेश सडमेक यांच्यासह आविसं व अजयभाऊ मित्र परिवाराचे पदाधिकारी तथा कार्यकर्ते उपस्थित होते.