Home पब्लिक प्रॉब्लेम नक्षली पत्रक प्रकरणातील ‘त्या’ आदिवासी तरुणांची अखेर सुटका

नक्षली पत्रक प्रकरणातील ‘त्या’ आदिवासी तरुणांची अखेर सुटका

भाकपाने लावून धरला होता मुद्दा

भामरागड : तालुक्यातील फुलनार–हिदूर दोबूर मार्गावर नक्षली बॅनर व पत्रके लावल्याच्या संशयावरून अटक करण्यात आलेले स्थानिक तरुण अखेर निर्दोष सुटले आहेत. या तरुणांच्या अटकेनंतर त्यांच्या कुटुंबीयांना आधार देत भारतीय कॅाम्युनिस्ट पार्टीने (CPI) त्या तरुणांची बाजू घेत ते निर्दोष असल्याचा दावा केला होता. अटकेनंतर त्यांना कारागृहातही पाठविण्यात आले होते. मात्र त्यांचा त्या नक्षल बॅनर-पत्रकांशी संबंध नसल्याने तपासानंतर त्यांची अखेर सुटका करण्यात आली. (खाली वाचा)

या प्रकरणात पोलिसांनी सहा स्थानिक तरुणांना अटक केली होती. अटकेनंतर त्यांच्या कुटुंबीयांमध्ये चिंता निर्माण झाली होती. संबंधित तरुण सामान्य आदिवासी कुटुंबांतील असून शेती व मजुरी करून उदरनिर्वाह करतात, असे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले होते. दरम्यान तरुणांच्या कुटुंबीयांनी भाकपाचे जिल्हा सहसचिव सचिन मोतकुरवार यांच्याकडे मदत मागितली. त्यांनी या प्रकरणात पुढाकार घेत तरुणांची बाजू मांडली. (खाली वाचा)

या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी आणि कोणत्याही निरपराध नागरिकावर अन्याय होऊ नये, अशी भाकपाची भूमिका होती. त्यासाठी राष्ट्रीय तपास संस्था (NIA) आणि इंटेलिजन्स ब्युरो (IB) यांच्याकडे निष्पक्ष पुनर्तपासाची मागणी करण्याबाबत पक्षाने पुढाकार घेतला होता.

सचिन मोतकुरवार म्हणाले, “या तरुणांच्या कुटुंबीयांनी अडचणीच्या काळात आमच्याकडे मदत मागितली. त्यांच्या वेदना आणि चिंता समजून घेत आम्ही त्यांची बाजू घेतली आणि हा मुद्दा लावून धरला. आज हे तरुण निर्दोष सुटल्याचे समजल्याने समाधान वाटते. आमच्यासाठी हा राजकीय श्रेयाचा विषय नव्हता, तर सामान्य आदिवासी कुटुंबांना न्याय मिळण्याचा प्रश्न होता. संकटाच्या काळात जनतेच्या पाठीशी उभे राहणे, हीच आमच्या पक्षाची भूमिका आहे.”

निर्दोष सुटल्यानंतर त्या तरुणांनी मोतकुरवार यांची भेट घेऊन आभार व्यक्त केले. यावेळी भाकपाचे जिल्हा सदस्य सुरज जक्कुलवार आणि त्या भागातील ग्रामस्थ उपस्थित होते.