एटापल्ली : दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात अनेक वेळा विविध वाहनांमधून अनधिकृतपणे दारूची आयात करण्याचे प्रकार उघडकीस आले आहे. पण यावेळी पहिल्यांदाच महिंद्रा थार या महागड्या गाडीने देशी-विदेशी दारूची वाहतूक करण्याचा प्रकार एटापल्ली पोलिसांनी उघडकीस आणला. याप्रकरणी एका आरोपीला अटक करत पोलिसांनी 2 लाख 90 हजारांची दारू आणि थार गाडी जप्त केली.
या दारू तस्करीबद्दल एटापल्ली ठाण्याचे अधिकारी व अंमलदारांना गोपनिय माहिती मिळाली होती. त्यावरून उपविभागीय पोलीस अधिकारी एटापल्ली आणि एटापल्ली पोलीस स्टेशनच्या पथकाने वेगवेगळ्या मार्गाने सापळा रचला होता. संशयित वाहन (थार) क्रमांक एमएच 32, एएस 7099 हे नारानूर, ताडपल्लीमार्गे लांझी गावात येताना दिसले. त्यावरून पोलीस पथकाने वाहन थांबवून तपासणी केली असता वाहनामध्ये अवैधरित्या देशी व विदेशी दारु मिळून आली.
पंचासमक्ष सदर वाहनाची झडती घेऊन त्यातील रॉकेट देशी दारू संत्रा कंपनीच्या 29 सिलबंद पेट्या आणि एक पेटी बिअर असा अवैध विक्री किंमत एकुण 2 लाख 90 हजार रुपयांचा देशी-विदेशी दारूसाठा जप्त करण्यात आला. तसेच अंदाजे 12 लाख रुपये किंमतीची थार गाडीही जप्त करण्यात आली. याप्रकरणी आरोपी मयुर विजय बालमवार (रा.वार्ड नं.7, गडचिरोली) याच्याविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला. पुढील तपास पोउपनि.ज्ञानेश्वर कोल्हे करीत आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम.रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) कार्तीक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी., उपविभागीय पोलीस अधिकारी एटापल्ली चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली, एटापल्लीचे प्रभारी अधिकारी पोनि मच्छिंद्र नागरगोजे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
































