आरमोरी : प्रतिबंधित सु्गंधित तंबाखूची अवैधरित्या साठवणूक करणाऱ्या देऊळगाव येथील गोपाल निंबेकर याच्या घर आणि वाहनातून पोलिसांनी 4 लाखांचा सुगंधित तंबाखू जप्त केला. या कारवाईत चारचाकी वाहनासह एकूण 9 लाख 30 हजार 990 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. आरोपी निंबेकर याच्यासह वाहनमालक विठ्ठल हर्षे यांनी पळ काढला. त्यांचा शोध सुरू आहे.
महाराष्ट्र शासनाने सुगंधित तंबाखूच्या विक्री व वाहतुकीवर कायदेशिर प्रतिबंध घातला आहे. त्याअनुषंगाने पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या आदेशानुसार, आरमोरी पोलिसांनी सुगंधित तंबाखूची अवैधपणे साठवणूक करणाऱ्या आरोपींवर कायदेशिर कारवाई करण्यासाठी पुढाकार घेतला. देऊळगाव येथील गोपाल निंबेकर याने त्याच्या राहत्या घरी मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित सुगंधित तंबाखू अवैधरित्या विक्रीकरीता साठवून ठेवला असल्याची माहिती आरमोरी पोलिसांना मिळाली होती.
त्यानुसार पोलीस पथकाने देऊळगाव येथील गोपाल निंबेकर याच्या राहत्या घरी पंचासमक्ष धाड टाकली. पण पोलीस पथक आल्याचा सुगावा लागल्याने आरोपी निंबेकर याने घटनास्थळावरुन पळ काढला. यानंतर पोलीस पथकाने आरोपीच्या घराची झडती घेतली असता, घरात मोठ्या प्रमाणावर अवैध तंबाखूची साठवणूक केलेली असल्याचे आढळून आले. यासोबतच आरोपीच्या घराजवळ एक पांढऱ्या रंगाची चारचाकी मारुती व्हॅगेनार वाहन दिसून आले. पोलीस पथकाने वाहनाची तपासणी केली असता, त्यामध्ये देखील अवैध तंबाखुचा साठा मिळून आला.
या कारवाईत हिरव्या, काळ्या, केशरी, शेंद्री रंगाचे होला हुक्का शिशा तंबाखू, ईगल हुक्का शिशा तंबाखु असे लिहिलेले एकूण 268 पॅकेट (एकूण किंमत अंदाजे 2,96,900 रुपये), तसेच मजा 108 कंपनीचे 25 नग सिलबंद खरड्याचे बॉक्स, मजा 108 हुक्का शिशा तंबाखु असे लिहीलेले 8 नग टिनाचे डब्बे, केसरयुक्त विमल पान मसाला असे प्रिंट असलेले 50 नग सिलबंद पाऊच व इतर सुगंधित तंबाखू असे एकूण किंमत अंदाजे 97 हजार 790 रुपये, 3) एक जुनी वापरती पांढया रंगाची (मारुती व्हॅगेनार) चारचाकी वाहन (क्र.एम एच 33 एसी 6256), किंमत अंदाजे 5 लाख रुपये, तसेच दोन मोबाईल आणि इतर साहित्य असा एकूण 9,30,990 रुपये किमतीचा मुद्देमाल आरमोरी पोलिसांनी जप्त केला.
आरोपी गोपाल निंबेकर आणि घटनास्थळावर उभ्या असलेल्या चारचाकी वाहनाचा मालक यशवंत विठ्ठल हर्षे, रा.गिलगाव यांच्यावर अन्न सुरक्षा कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास पोउपनि. विजय चलाक करीत आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम.रमेश, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी., सहा.पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन आरमोरीचे निरीक्षक कैलास गवते यांच्या नेतृत्वात पोउपनि.सुरज अनपट, विजय चलाख व पोलीस अंमलदारांनी पार पाडली.
































