कुरखेडा : तालुक्यातील खेडेगावच्या जंगलात बिनधास्तपणे सुरू असलेल्या मोठ्या जुगारावर अखेर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकासह कुरखेडा पोलिसांनी धाड मारून 22 जुगाऱ्यांना अटक केली. त्यात अनेक रग्गड जुगार शौकिनांचा समावेश असल्याचे समजते. या कारवाईत त्यांच्या 13 चारचाकी वाहनांसह 6 दुचाकी आणि रोख 2 लाख 75 हजार रुपये असा एकूण 71 लाख 85 हजार रुपयांचा मु्द्देमाल जप्त करण्यात आला.
जिल्ह्यातील अवैध व्यवसायांवर अंकुश बसविण्यासाठी पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या सूचनेनुसार, मंगळवारी (दि.21) ही कारवाई करण्यात आली. प्राप्त माहितीनुसार, दि.21 रात्री 1 वाजताच्या सुमारास कुरखेडा येथील एजाज शेख ऊर्फ कात्या हा खेडेगाव जंगल परिसरात बेकायदेशिररित्या काही इसमांना गोळा करुन ताश पत्त्यांच्या सहाय्याने जुगार खेळवत होता, अशी गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक भगतसिंग दुल्हत व पोलीस पथक गेवर्धा येथे पोहोचले. तेथून दोन स्थानिक पंचांसह जंगल परिसरात जाऊन घटनास्थळी धाड टाकली.
पोलिसांची चाहूल लागताच काही इसम पळू लागले. यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक आणि कुरखेडा ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेंद्र वाघ व पोलीस पथकाने घटनास्थळावर जुगार खेळणारे आरोपी, त्यांचे जुगार साहित्य तसेच रोख रक्कम ताब्यात घेतली. एजाज रफिक शेख ऊर्फ कात्या (41 वर्षे), याच्यासह एकूण 22 आरोपींना अटक करून कायदेशीर कारवाई करण्यात आली.
आरोपींच्या अंगझडतीदरम्यान घटनास्थळावरून 2,75,200 रुपये रोख रक्कम, तसेच जुगार खेळण्याचे पत्ते, 23 मोबाईल, 13 चार चाकी वाहने, 6 दुचाकी वाहने असा एकूण 71 लाख 85 हजार 330 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुढील तपास पोनि.महेंद्र वाघ करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम.रमेश, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी., कुरखेडाचे उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि.अरुण फेगडे, कुरखेडाचे पोनि.महेंद्र वाघ, स्थागुशाचे सपोनि.भगतसिंग दुल्हत, हवालदार सुधाकर दंडीकेवार, अंमलदार राजू पंचफुलीवार, श्रीकांत बोईना, निशीकांत अलोने, भास्कर आघाव, राजकुमार खोब्रागडे, दीपक लोणारे, तसेच पोस्टे कुरखेडाचे हवालदार शेखलाल मडावी, नायक अमोल आलाम, अंमलदार संदेश भैसारे, नंदकिशोर मेश्राम, नरसिंह कोरे यांनी केली.
































