गडचिरोली : दिव्यांग व्यक्तींच्या विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या आर्थिक सहाय्य योजनेत यावर्षी प्राधान्यक्रमानुसार 11 जोडप्यांना पात्र ठरविण्यात आले. त्यापैकी प्रतिनिधिक स्वरूपात 3 लाभार्थी जोडप्यांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांच्या हस्ते धनादेश व भेटवस्तू वितरित करण्यात आल्या. यासोबतच राज्यस्तरीय दिव्यांग मुलांच्या क्रीडा स्पर्धांमध्ये यश मिळवलेल्या जिल्ह्यातील 4 विद्यार्थ्यांचा देखील सीईओ गाडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला जिल्हा समाजकल्याण अधिकारी चेतन हिवंज प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या आयोजनात सहाय्यक प्रकल्प अधिकारी वर्षा ढवळे, सहाय्यक लेखा व प्रशासन अधिकारी पुष्पा पारसे, विस्तार अधिकारी जगदीश मेश्राम, समाजकल्याण निरीक्षक निलेश तोरे, तसेच निखील उरकुडे, माया गायकवाड, नरेश नायक यांचा सहभाग होता. समाजकल्याण विभागाचे, तसेच दिव्यांग शाळांचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.