गडचिरोली : उद्योजक म्हणून महिलांनी पुढे यावे आणि त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँक आणि नाबार्डच्या वतीने नवउद्योजक महिलांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा बँकेच्या सभागृहात गुरूवारी हा सोहळा पार पडला. यावेळी महिलांनी उद्योगासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन करत त्यांना कशा पद्धतीने कर्ज उपलब्ध होऊ शकते, त्यासाठी शासनाच्या काय योजना आहेत, यावर मार्गदर्शनही करण्यात आले.
या कार्यक्रमाला नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक नारायण पौनीकर, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक प्रशांत धोंगले, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश आयलवार, ‘आत्मा’च्या जिल्हा अंमलबजावणी कक्षाच्या व्यवस्थापक अर्चना राऊत, आरसेटीचे संचालक कैलास बोलगमवार आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी महिला कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होऊ शकतात असा विश्वास व्यक्त केला. महिला घरातील व्यवस्थापन ज्या पद्धतीने व्यवस्थित सांभाळतात, त्याच पद्धतीने एखादा व्यवसाय, उद्योग सांभाळू शकतात. पैशाचे योग्य नियोजन, बचत करण्याची वृत्ती त्यांच्यात उपजत असते. त्यामुळे त्यांनी उद्योग क्षेत्रात भरारी घ्यावी, त्यांना बँकांकडून योग्य मार्गदर्शन आणि कर्जपुरवठा केला जाईल, असा विश्वास यावेळी देण्यात आला.
विशेष म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँकेने 6 ते 18 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यासाठी स्वप्नसंचय योजना सुरू केली आहे, त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन साईओ सतीश आयलवार यांनी प्रास्ताविक भाषणात महिलांना केले. या कार्यक्रमाला सर्व वयोगटाच्या महिलांची भरगच्च उपस्थिती होती.
या कार्यक्रमाला बचत गटाच्या सदस्य, आरसेटी मधील प्रशिक्षणार्थी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे संचालन बँकेचे अधिकारी किरण सांबरे यांनी तर आभार नंदकिशोर नाकतोडे यांनी मानले.