धावपटू लच्चा वेलादी याचा अजय कंकडालवार यांच्याकडून सत्कार व मदत

आंतरराष्ट्रीय स्पर्धेत करणार प्रतिनिधीत्व

अहेरी : आंतरराष्ट्रीय धावपटू आणि राष्ट्रीय स्पर्धेत कांस्यपदक विजेता लच्चा दुग्गा वेलादी याचा आविसं अजयभाऊ मित्र परिवाराचे विदर्भ नेते, माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजय कंकडालवार यांनी शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.

अहेरी तालुक्यातील अतिदुर्गम व नक्षलग्रस्त भाग असलेल्या दोडगीर गावातील लच्चा वेलादी या युवकाने राष्ट्रीयस्तरावरील धाव स्पर्धेत कांस्यपदक पटकावले. तसेच हरियाणा राज्यात पार पडलेल्या आंतरराज्यीय स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घातली. त्यामुळे त्याने दुबई येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत स्थान मिळवले आहे.

धावपटू लच्चा याची घरची परिस्थिती अतिशय बेताची आहे. असे असतानाही त्यांने परिस्थितीला तोंड देत हे यश मिळवले आहे. त्यामुळे अजय कंकडालवार यांनी त्याला दुबईतील स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आर्थिक मदत दिली. मागील महिन्यात २८ ते ३० जुलैदरम्यान हरियाणातील पानिपतमध्ये इंडियन ऑलिम्पिक अॅथेलेटिक्सच्या ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत महाराष्ट्र चमूतून लच्चा वेलादी याने प्रथम स्थान पटकावले होते. आता दुबई येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत त्याची निवड झाली आहे. ६ ते ९ ऑक्टोबरदरम्यान सदर स्पर्धा होणार आहेत. यात भारतीय संघात लच्चा दुग्गा वेलादी प्रतिनिधित्व करणार आहे.