Home दैनंदिन बातम्या नवजात बाळाला वाचविण्यासाठी पोलिसांनी केले तातडीने रक्तदान

नवजात बाळाला वाचविण्यासाठी पोलिसांनी केले तातडीने रक्तदान

अधिकारी व अंमलदाराची संवेदनशिलता

गडचिरोली : जिल्ह्याच्या पोलीस दलातील अधिकारी आणि जवान नेहमीच नागरिकांच्या सुविधा आणि मदतीसाठी तत्पर असतात. त्यात एक पाऊल पुढे जाऊन नवजात बाळाला वाचविण्यासाठी हव्या असलेल्या रक्तगटाची गरज असल्याने एका पोलीस अधिकाऱ्यासह महिला अंमलदाराने तातडीने रक्तदान करून संवेदनशिलतेचा परिचय दिला.

एटापल्ली तालुक्यातील 32 वर्षीय शांता गावडे यांनी दि.22 ऑगस्ट 2026 रोजी हेडरी येथील लॉयड्स काली अम्मल मेमोरियल रुग्णालयामध्ये तिळ्या बाळांना जन्म दिला होता. मुदतपूर्व जन्म झाल्याने तिन्ही नवजात बालकांना विशेष वैद्यकीय देखरेखीखाली एनआयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. त्यापैकी एका बाळामध्ये रक्ताची कमतरता असल्याने त्याची प्रकृती खालावली होती. त्यामुळे पोलिसांनी पुन्हा एकदा माणुसकीचे दर्शन घडवत त्या बाळाला रक्तपुरवठा करुन जीवनदान दिले.

शांता गावडे यांच्या तीन नवजात बाळांपैकी एका बालिकेची प्रकृती दि.28 ऑगस्ट रोजी खालावली होती. तिच्या प्लेटलेट्सची संख्या कमी झाल्याने प्रकृती चिंताजनक बनली होती. तातडीने रक्ताची आवश्यकता असल्याचे डॅाक्टरांनी सांगितले. मात्र त्यावेळी लॉयड्स काली अम्मल मेमोरियल हॉस्पिटलमध्ये बाळाला हव्या असलेल्या ओ-पॅाझिटिव्ह रक्तगटाचे रक्त उपलब्ध नसल्याने रुग्णालय प्रशासनाने गडचिरोली पोलीस दलाशी संपर्क साधला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक गडचिरोली एम.रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली नागरी कृती शाखेच्या वतीने पुढाकार घेत गडचिरोली रक्त संकलन केंद्राच्या सहकार्याने ते रक्त उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. यावेळी ऑपरेशन सेल, पोलीस अधीक्षक कार्यालय, गडचिरोली येथे कार्यरत पोलीस उपनिरीक्षक शिवप्रसाद बंडीगरे आणि नागरी कृती शाखेतील महिला पो.अंमलदार आंचल कुमरे यांनी नवजात बालिकेसाठी स्वेच्छेने रक्तदान केले. त्यांच्या तत्पर पुढाकाराने बाळासाठी आवश्यक ओ-पॅाझिटिव्ह रक्तगटाच्या दोन बॅग उपलब्ध करून देण्यात आल्या.

वेळीच हव्या असलेल्या रक्तगटाचे रक्त उपलब्ध झाल्याने नवजात बाळाच्या उपचाराला मोठी मदत झाली असून बाळाच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. नवजात बाळाचे आई-वडील, तसेच रुग्णालय प्रशासनाने गडचिरोली पोलीस दलाच्या तत्परतेबद्दल आणि माणुसकीच्या भावनेतून केलेल्या मदतीबद्दल आभार व्यक्त केले. तसेच पोलीस अधीक्षक एम.रमेश यांनी देखील तत्परतेने रक्तदान करणा­ऱ्या पोलीस अधिकारी व महिला अंमलदारांचे कौतुक केले.