Home दैनंदिन बातम्या ऑस्ट्रेलियात शिक्षण घेऊन परतलेला बांडे गावचा तरुण झाला मॅनेजमेंट ट्रेनी

ऑस्ट्रेलियात शिक्षण घेऊन परतलेला बांडे गावचा तरुण झाला मॅनेजमेंट ट्रेनी

'लॉयड्स'ने दिले शिक्षण व रोजगार

गडचिरोली : जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील बांडे या दुर्गम गावातील साधारण कुटुंबात जन्मलेल्या इग्नासियस प्रकाश बाडा याच्यासारख्या तरुणासाठी विदेशात जाऊन शिक्षण घेणे हे एक स्वप्नच होते. मात्र लॅायड्स इनफिनिट फाउंडेशनच्या सहकार्याने इग्नासियस याने ऑस्ट्रेलियातील पर्थ येथील कर्टिन युनिव्हर्सिटीमधून इनोव्हेशन अँड एंटरप्रेन्युअरशिपमध्ये मास्टर डिग्री पूर्ण केली. एवढेच नाही तर लॅायड्स मेटल्स अॅन्ड एनर्जी लिमिटेडने त्याला आपल्या कंपनीत सामावून घेत मॅनेजमेंट ट्रेनी या पदावर रुजूही करून घेतले.

गडचिरोलीतील सुरजागड लोहखनिज खाणीच्या परिसरातील दुर्गम बांडे गावात सात जणांच्या कुटुंबात वाढलेल्या इग्नासियसची आई सरिता अंगणवाडी मदतनीस असून वडील प्रकाश हे शेतकरी आहेत. अशा कुटुंबातील एक होतकरू तरूण उच्चशिक्षण घेऊन मोठ्या पदावर रुजू झाल्याने ही बाब गावकऱ्यांसाठी अभिमानाची ठरली आहे.

लॉयड्स इनफिनिट फाउंडेशनच्या कर्टिन युनिव्हर्सिटी स्पॉन्सरशिप प्रोग्रामच्या पहिल्या बॅचमधील शिक्षण पूर्ण करणारा इग्नासियस हा पहिला विद्यार्थी ठरला आहे. ही संधी लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडची सीएसआर शाखा असलेल्या लॉयड्स इनफिनिट फाउंडेशनने सुरू केलेल्या शिष्यवृत्ती कार्यक्रमातून मिळाली. या कार्यक्रमाचा उद्देश या भागातील गुणवंत विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय अनुभव मिळवण्यासाठी मदत करणे हा आहे. या कार्यक्रमांतर्गत इग्नासियस यांच्या शिक्षण शुल्कासह निवास, प्रवास आणि दैनंदिन जीवनावश्यक खर्चाची जबाबदारी घेण्यात आली.

आपल्या प्रवासाबद्दल बोलताना इग्नासियस म्हणाले, “हे माझ्यासाठी स्वप्न साकार झाल्यासारखे आहे. बांडे गावातून येताना ऑस्ट्रेलियात शिक्षण घेण्याची आणि पूर्णपणे वेगळ्या शैक्षणिक व सांस्कृतिक वातावरणाचा अनुभव घेण्याची संधी मिळाल्याने माझा दृष्टिकोन, आत्मविश्वास आणि महत्त्वाकांक्षा बदलल्या. हा प्रवास शक्य करून दिल्याबद्दल आणि माझ्यासारख्या विद्यार्थ्यांना अशा संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मी लॅायड्सचे एमडी बी.प्रभाकरन यांचा मनापासून आभारी आहे. आपल्या गावात परत येऊन येथेच माझ्या कारकिर्दीला सुरुवात करणे हा या प्रवासाचा माझ्यासाठी अत्यंत अर्थपूर्ण भाग आहे.”

ही उल्लेखनीय कामगिरी लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर बी.प्रभाकरन यांनी 2023 मध्ये केलेल्या त्या वचनबद्धतेचेही प्रतीक आहे, ज्यामध्ये त्यांनी स्थानिक युवकांना उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासोबतच त्यांना आपल्या भागाच्या विकासात योगदान देण्यासाठी प्रोत्साहित करण्याचा संकल्प केला होता.

या यशाबद्दल बोलताना बी.प्रभाकरन म्हणाले, “हा आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा क्षण आहे. हा कार्यक्रम सुरू करताना आम्ही स्थानिक युवकांसाठी जागतिक स्तरावरील संधी उपलब्ध करून देण्याचे आणि त्यांनी परत येऊन गडचिरोलीच्या विकासात योगदान द्यावे, यासाठी त्यांना प्रोत्साहित करण्याचे वचन दिले होते. इग्नासियसने हे वचन प्रत्यक्षात साकार होऊ शकते, हे दाखवून दिले आहे. बांडेपासून कर्टिनपर्यंत आणि पुन्हा लॉयड्समध्ये परत येण्यापर्यंतचा त्याचा प्रवास या भागातील अनेक तरुणांना प्रेरणा देईल. ही तर केवळ सुरुवात आहे.”

दुर्गम गावातील शेतकरी आणि अंगणवाडी मदतनीस यांच्या कुटुंबातून ऑस्ट्रेलियातील विद्यापीठापर्यंत पोहोचण्यापासून ते आता मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून मायभूमीत परतण्यापर्यंतचा इग्नासियस यांचा प्रवास या स्पॉन्सरशिप कार्यक्रमांतर्गत पूर्ण झालेला पहिला प्रवास आहे. त्यांची ही यशोगाथा या भागातील इतर विद्यार्थ्यांसाठीही प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे.