Home दैनंदिन बातम्या कार्यकारी अभियंत्याविरूद्ध आज गडचिरोलीत ‘डफडी’ आंदोलन

कार्यकारी अभियंत्याविरूद्ध आज गडचिरोलीत ‘डफडी’ आंदोलन

शासन-प्रशासनाचे लक्ष वेधणार

गडचिरोली : येथील सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक 2 चे कार्यकारी अभियंता सुरेश साखरवाडे यांच्यावर फौजदारी कारवाई करून त्यांना सेवेतून निलंबित करावे, तसेच त्यांना गडचिरोली जिल्ह्यातून बाहेर पाठवावे, या मागणीसाठी जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते अरविंद कात्रटवार यांच्या नेतृत्वात आज, दि.25 मे रोजी ‘डफडी बजाओ’ आंदोलन केले जाणार आहे.

सकाळी 11 वाजता सार्वजनिक बांधकाम विभाग, अधीक्षक अभियंता यांच्या कार्यालयासमोर हे आंदोलन करून शासन व प्रशासनाचे या विषयाकडे लक्ष वेधण्यात येणार आहे. या आंदोलनात मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन अरविंद कात्रटवार मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

साखरवाडे यांच्या कार्यकाळातील कोरची तालुक्यातील नाडेकल-बेतकाठी मार्गावरील खोब्रागडी नदीवरील अंदाजे 5 कोटीचा पूल रहदारी सुरू होण्यापुर्वीच कोसळला. भ्रष्टाचार करून पुलाचे काम निकृष्ट केल्यानेच तो कोसळल्याचा आरोप कात्रटवार यांनी केला आहे. त्याचबरोबर कार्यकारी अभियंत्यानी 2025-26 या आर्थिक वर्षात ग्रामीण भागातील रस्ते दुरूस्ती व पुल दुरूस्तीच्या 50 कोटींच्या कामात भ्रष्टाचार केल्याचा संशय कात्रटवार यांनी व्यक्त केला. तसेच 3 वर्षात हजारो कामांच्या निविदा नियबाह्यपणे काढून सदर कामे केवळ मजूर सहकारी सहकारी संस्थांना 20 टक्क्याने विकल्याचा आरोपही कात्रटवार यांनी केला आहे.

या संपूर्ण कामांची चौकशी करून कार्यकारी अभियंता सुरेश साखरवाडे यांच्यावर कारवाई झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा अरविंद कात्रटवार यांनी दिला आहे.