गडचिरोली : गडचिरोली या अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी राहुल कुमार मीना यांच्या नियंत्रणाखाली प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. 26 व 27 ऑक्टोबर रोजी ईव्हीएम यंत्र हाताळण्याच्या प्रात्यक्षिकासह मतदान प्रक्रियेसंबंधीचे पहिले प्रशिक्षण येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत पार पडले. यावेळी अनेक कर्मचाऱ्यांनी पहिल्यांदा ईव्हीएम हाताळण्याचा अनुभव घेतला.
गडचिरोली विधानसभा क्षेत्रात गडचिरोली, धानोरा व चामोर्शी या तीन तालुक्यांचा समावेश आहे. या क्षेत्रात 26 मतदान केंद्र असून एकूण 1 हजार 819 मतदान अधिकाऱ्यांची निवडणूक प्रक्रियेत नेमणूक करण्यात आली आहे. प्रशिक्षणात मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाऱ्यांनी कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट व व्हीव्हीपॅट यंत्र हाताळण्याचे कौशल्य जाणून घेतले. यावेळी मतदान प्रक्रियेतील मतदान अधिकारी, केंद्राध्यक्ष यांना नेमून दिलेले कामकाज, कर्तव्य व जबाबदाऱ्यांची जाणीव प्रशिक्षणात करून देण्यात आली. मतदान केंद्र तयार करणे, मतदानाची पूर्वतयारी, मतदान युनिट तयार करणे, नियंत्रण युनिट तयार करणे, अभिरुप मतदान घेणे, कागदी मोहर लावणे, प्रत्यक्ष मतदानासाठी मतयंत्र तयार करणे, मतदारांची ओळख पटविणे, प्रदत मत, आक्षेपित मत, मतदान प्रक्रिया संबंधित कायदे, विविध प्रपत्रे व संपूर्ण मतदान प्रक्रियेबाबत विस्तृत माहिती देण्यात आली. प्रशिक्षणार्थींच्या मनात उपस्थित झालेल्या शंका व प्रश्नांचे निराकरणही यावेळी करण्यात आले.
प्रशिक्षणस्थळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी राहुल कुमार मीना यांच्यासह सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी (चामोर्शी) अमित रंजन, गडचिरोली विधानसभा मतदार संघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार संतोष आष्टीकर, धानोराचे तहसीलदार अविनाश शेंबटवाड, चामोर्शीचे तहसीलदार प्रशांत घोरूडे, गडचिरोलीचे नायब तहसीलदार अमोल गव्हारे, नायब तहसीलदार हेमंत मोहरे, नायब तहसीलदार चंदू प्रधान, अनिल सोमनकर, महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.