गडचिरोली : महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या निर्णयान्वये, गतिमान प्रशासन तथा आपत्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण या योजनेअंतर्गत महसूल क्षेत्रीय कार्यालयाकडून जनतेस विविध शासकीय सेवा व सोयी सुविधा गतिमान पद्धतीने उपलब्ध करुन देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान गडचिरोली विधानसभा मतदार संघाच्या क्षेत्रात राबविण्यात येत आहे. त्यानुसार गडचिरोलीत दि.22 रोजी मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
विधानसभा मतदार संघ क्षेत्रातील गडचिरोली, धानोरा, चामोर्शी या तालुक्यांकरीता मुख्य कार्यक्रम 22 जुलै 2026 रोजी सकाळी 10 वाजता सुमानंद सभागृह, आरमोरी रोड, गडचिरोली येथे आयोजित करण्यात आला आहे, असे नोडल अधिकारी तथा तहसीलदार सागर कांबळे यांनी कळविले आहे.
या शिबिरात विविध शासकीय योजनांचा लाभ, जिवंत सातबारा अभियान, गावठाण स्वामित्व सनद वितरण, मुख्यमंत्री बळीराजा पांदण रस्ते योजना, निवासी अतिक्रमणे नियमित करणे, महिला शेतकरी प्रमाणपत्र वितरण, कौटुंबिक वाटणी पत्र नोंदणी, महसूल सेवा आणि तक्रारींचे निवारण होणार आहे.
शिबिराचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी आधार कार्ड, रेशन कार्ड, सातबारा उतारा, आणि संबंधित कामांची मूळ कागदपत्रे आणि झेरॅाक्स आणाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
































