गडचिरोली : विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा आणि जिल्हा पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी काल जिल्हा औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) येथील निवडणूक साहित्य वाटप व्यवस्था आणि जिल्हा कोषागार कार्यालयातील स्ट्राँग रूमची पाहणी केली.
आयटीआय येथे त्यांनी निवडणूक कर्तव्यावर नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून साहित्य वाटपाच्या तयारीची माहिती घेतली. साहित्य वाटप सुरळीत होण्यासाठी नियोजन करण्याच्या तसेच परिसरात आवश्यक पोलीस बंदोबस्त ठेवण्याच्या व सुरक्षा उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी पंडा यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. त्यानंतर त्यांनी जिल्हा कोषागार कार्यालयातील मतपत्रिकांच्या सुरक्षित साठवणुकीसाठी असलेल्या स्ट्राँग रूमची सुरक्षा व्यवस्था तपासली.
यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल जाधव, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी संजय त्रिपाठी, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी जाधव, तहसीलदार संतोष आष्टीकर (निवडणूक) यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
मतदानासाठी 4 तासांची विशेष सवलत
नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी खासगी आस्थापनांमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना पूर्वी जाहीर करण्यात आलेल्या 2 तासांऐवजी आता 4 तासांची विशेष सवलत (नैमित्तिक रजा) देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघासाठी शुक्रवार, 23 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत मतदान पार पडणार आहे. सुरुवातीला खासगी आस्थापनांमधील मतदारांना मतदान करण्यासाठी 2 तासांची सवलत देण्याबाबत कळविण्यात आले होते. मात्र, काही ठिकाणी मतदान केंद्रांचे अंतर जास्त असल्याने मतदारांना प्रवासासाठी अधिक वेळ लागतो. ही बाब लक्षात घेऊन राज्य निवडणूक आयोगाकडून मतदारांची गैरसोय टाळण्यासाठी ही सवलत 2 तासांवरून वाढवून 4 तास करण्यात आली असल्याचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा अपर आयुक्त (सा.प्र.) प्रदीप कुलकर्णी यांनी कळविले आहे.
































