Home दैनंदिन बातम्या यावर्षी 7 शासकीय वसतिगृहांमध्ये प्रवेश घेण्याची विद्यार्थ्यांना संधी

यावर्षी 7 शासकीय वसतिगृहांमध्ये प्रवेश घेण्याची विद्यार्थ्यांना संधी

ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू

गडचिरोली : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत जिल्ह्यात कार्यरत असलेल्या शासकीय वसतिगृहांमध्ये शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी 1 जूनपासून प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, वरिष्ठ महाविद्यालये तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना या वसतिगृहांमध्ये प्रवेश घेण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

समाजकल्याण विभागामार्फत विद्यार्थ्यांसाठी निवास, भोजन, शैक्षणिक वातावरण व इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक आधार मिळावा, या उद्देशाने ही योजना राबविण्यात येत आहे.

प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज भरावा. विद्यार्थ्यांनी अर्ज भरल्यानंतर त्याची प्रिंट काढून आवश्यक कागदपत्रांसह संबंधित शासकीय वसतिगृहाच्या कार्यालयात जमा करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

या वसतिगृहांमध्ये मिळणार प्रवेश

1.क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले शासकीय वसतिगृह, रामनगर, गडचिरोली, 2.क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले शासकीय वसतिगृह, विसापूर रोड, गडचिरोली, 3.भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह (गुणवंत), गडचिरोली, 4.क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले शासकीय वसतिगृह, वांगेपल्ली-अहेरी, अहेरी, 5.क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले शासकीय वसतिगृह, आरमोरी, 6.भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह, नवेगाव आणि 7.भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह, चामोर्शी या शासकीय वसतिगृहांमध्ये प्रवेश मिळणार असून शालेय, कनिष्ठ महाविद्यालयीन व विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना त्याचा लाभ घेता येणार आहे.

मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी या सुविधेचा लाभ घेऊन लवकरात लवकर अर्ज सादर करावेत, असे आवाहन सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त डॉ.सचिन मडावी यांनी केले आहे.