गडचिरोली : विश्व संवाद केंद्र, विदर्भ प्रांताच्या चंद्रपूर विभागाच्या वतीने देवर्षी नारद जयंतीनिमित्त चंद्रपुरातील श्यामाप्रसाद मुखर्जी सभागृहात आयोजित कार्यक्रमात गडचिरोलीतील ज्येष्ठ पत्रकार अविनाश भांडेकर यांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व ग्रंथ प्रदान करून गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम क्षेत्र (मुंबई) प्रचारक प्रमोद बापट, चंद्रपूरचे ज्येष्ठ पत्रकार मुरलीमनोहर व्यास, गडचिरोली जिल्हा प्रसार प्रमुख प्रा.राकेश इनकणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मार्गदर्शन करताना प्रमोद बापट म्हणाले, “आद्य पत्रकार देवर्षी नारद हे भारतीय परंपरेतील पहिले पत्रकार मानले जातात. त्यांनी सत्य, संवाद आणि समाजहिताची भावना जपत माहितीचे आदान-प्रदान केले. आजच्या पत्रकारांसाठी त्यांचा आदर्श प्रेरणादायी आहे. संदेशवहन हा नियतकालिकांचा आत्मा असून, टीआरपीच्या स्पर्धेत अनेकदा सत्यापेक्षा निरुपयोगी बाबींना अधिक महत्त्व दिले जाते. घटनेचे सत्य एकच असते, मात्र त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असू शकतो. त्यामुळे बातमीवर योग्य प्रक्रिया करून समाजाला काय आवश्यक आहे, याचा शोध पत्रकारांनी घेतला पाहिजे” असे त्यांनी सूचित केले.
यावेळी पत्रकार अविनाश भांडेकर यांना 35 वर्षांपासून पत्रकारितेतील योगदानासाठी सन्मानित करण्यात आले. त्यांना यापूर्वी विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. कार्यक्रमाला चंद्रपूर प्रसार प्रमुख कपिष उजगावकर, विजय एंगलवार, तसेच शहरातील विविध पत्रकार व मान्यवर उपस्थित होते.
































