रेझिंग डे सप्ताहानिमित्त गडचिरोलीत पोलिस दलाचे शानदार पथसंचलन

कसा होता नजारा, पहा व्हिडिओ

default

गडचिरोली : महाराष्ट्र पोलिस दलाच्या स्थापना दिनानिमित्त 2 ते 8 जानेवारीपर्यंत रेझिंग-डे सप्ताह साजरा केला जातो. यानिमित्त शुक्रवारी पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या उपस्थितीत गडचिरोली पोलिस दलाने शहराच्या मुख्य मार्गाने शानदार पथसंचलन केले. यात पोलिस बँडसह पोलिस दलातील विविध शाखांनी तसेच शालेय विद्यार्थ्यांनीही सहभाग घेतला.

2 जानेवारीपासून जिल्ह्रातील सर्व पोस्टे, उपपोस्टे,पो.मदत केंद्रांमध्ये रेझिंग डे साजरा करण्यात येत आहे. गडचिरोली पोलिस दलाकडून प्रत्येक शाळेमध्ये शस्त्र प्रदर्शन, गडचिरोली पोलिस दलाविषयी माहिती, सायबर गुन्हे, महिला सुरक्षा या विषयीचे फलक दर्शवून लोकांमध्ये जनजागृती तसेच स्वच्छता अभियान, रस्ता सुरक्षा रॅली व व्यसनमुक्ती संकल्प रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी गडचिरोली शहरातील कारगील चौकापासून पथसंचलन सुरु होऊन इंदिरा गांधी चौक ते बस स्थानक आणि परत इंदिरा गांधी चौक असे पथसंचलन करण्यात आले.

पथसंचलनामध्ये ध्वजवाहक, पोलिस मुख्यालय महिला प्लाटून, विशेष अभियान पथकाचे प्लाटून, बँड पथक, स्टुडंट पोलिस कॅडेट प्लाटून, शालेय विद्यार्थी, बुलेट प्लाटून, टु-व्हिलर वाहन प्लाटून, श्वान पथक, बीडीडीएस पथक व एमपीव्ही वाहन यांनी सहभाग घेतला. यावेळी विविध शाखेतील अधिकारी व अंमलदार तसेच शासकीय इंग्रजी माध्यमिक आश्रमशाळा, राणी दुर्गावती विद्यालय, विद्याभारती हायस्कूल, जिल्हा परिषद हायस्कूल, संत गाडगेबाबा विद्यालय, शिवाजी हायस्कूल तसेच वसंत विद्यालयाचे एनसीसी, स्काऊट गाईड व स्टुडंट पोलिस कॅडेट अशा 500 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.

सदर पथसंचलनामध्ये पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, अपर पोलिस अधीक्षक (अहेरी) एम.रमेश, उपविभागीय पोलिस अधिकारी मयुर भुजबळ, गडचिरोली ठाण्याचे निरीक्षक अरुण फेगडे, राखीव पोलिस निरिक्षक घनशाम चव्हाण व विविध शाखांचे पोलिस अधिकारी, अंमलदार उपस्थित होते.