गडचिरोली : नवीन वर्ष 2025 च्या पहिल्याच दिवशी, म्हणजे उद्या 1 जानेवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर कोनसरी येथे येत आहेत. नव्याने मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर त्यांचा हा गडचिरोली जिल्ह्याचा पहिलाच दौरा आहे. विशेष म्हणजे त्यांच्या हस्ते यावेळी लॅायड्स मेटल्सच्या विविध उपक्रमांचे उद्घाटन आणि भूमिपूजन होणार आहे. भाजपचे राष्ट्रीय महामंत्री (एसटी मोर्चा) तथा माजी खासदार अशोक नेते यांच्यासह भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आज कोनसरी येथील कार्यक्रमस्थळी भेट देऊन तयारीची पाहणी केली.
यावेळी आ.डॅा.मिलिंद नरोटे, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, ज्येष्ठ नेते बाबुरावजी कोहळे, रविंद्र ओल्लालवार, प्रा.रमेश भारसागड या पदाधिकाऱ्यांसह लॅायड्स मेटल्सचे व्यवस्थापकीय संचालक बी.प्रभाकरन, कार्यकारी संचालक एस.वेंकटेश्वरन, बलराम सोमनानी व इतर अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
बुधवारी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते लॅायड्सच्या डीआरआय प्लान्टचे उद्घाटन, लॅायड्स राज विद्या निकेतन (सीबीएसई शाळा), लॅायड्स काली अम्माल मेमोरिअल हॅास्पिटल, लॅायड्स वन्या क्लोदिंग कंपनी, फॅमिली क्वॅार्टर्स, पोलीस अॅाफिसर्स फॅमिली क्वॅार्टर्स, जिमखाना, बालोद्यान आदींचे उद्घाटन होणार आहे. याशिवाय स्लरी पाईपलाईन, पेलेट प्लान्ट आणि आयरन ओर ग्राइंडिंग युनिटचे भूमिपूजन केले जाणार आहे.