भामरागड : जिल्ह्याच्या पूर्व टोकावरील भामरागड तालुक्याकडे बहुतांश राजकीय पक्षांचे फारसे लक्ष नाही. पण अलिकडे मंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर धर्मरावबाबा आत्राम यांनी दक्षिण गडचिरोलीकडे लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे भामरागड तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची पकड मजबूत होत असल्याचे दिसत आहे. गेल्या आठवड्यात भामरागड दौऱ्यात अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम आणि माजी जि.प.अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांच्या उपस्थितीत विविध पक्षाच्या अनेक नव्या-जुन्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर विश्वास टाकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
यावेळी भामरागड येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुकास्तरीय कार्यकर्ता मेळाव्यात मार्गदर्शन करताना ना.धर्मरावबाबा यांनी लोकशाहीत राजकीय पक्षाची ताकद ही त्यांच्या कार्यकर्त्याच्या क्षमतेवर आहे. पक्षाचे ध्येयधोरण आणि पक्षाच्या सरकारने केलेल्या विकास कामांची माहिती जनतेपर्यंत नेण्याचे खरे काम हे कार्यकर्ते करतात. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करणारा प्रत्येक कार्यकर्ता हा पक्षाची ओळख आहे. पदाधिकाऱ्यांनी सामान्य कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पक्ष संघटना मजबूत करावी. सामान्य कार्यकर्ता हा पक्षाचा कणा आहे, अशी सूचना यावेळी धर्मरावबाबा यांनी केली.
यावेळी माजी पं.स. सदस्य हर्षवर्धनबाबा आत्राम, राष्ट्रवादी काँग्रेसचे भामरागड तालुका अध्यक्ष रमेश मारगोनवार, तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.
महायुती सरकारकडून विविध शासकीय योजना राबविल्या जात आहेत. त्या सर्व योजना तालुक्यातील शेवटच्या घरापर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा. वेळोवेळी पक्षातर्फे राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती घेऊन सामाजिक कार्य करावे, असेही निर्देश धर्मरावबाबा यांनी यावेळी दिले. यावेळी भाग्यश्री आत्राम यांनीही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत भामरागड तालुक्यातील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.