62 वर्षात मिळाला नाही तेवढा निधी गेल्या 9 वर्षात मिळाला- आ.होळी

90 टक्के समस्या सोडविल्याचा दावा

गडचिरोली : गडचिरोली विधानसभा मतदार क्षेत्राचा मी आमदार झाल्यानंतर गेल्या ९ वर्षात मोठ्या प्रमाणात निधी मिळून विकासात्मक कामे केली. त्यामुळे या मतदार संघातील ९० टक्के समस्या सोडवण्यात आपल्याला यश आले आहे, असा दावा आमदार डॅा.देवराव होळी यांनी येथे पत्रकार परिषदेत केला. विरोधी पक्षातील लोक माझ्याविरूद्ध अनेक डाव रचून मला बदनाम करण्याचा प्रयत्न करत असतात, पण मी त्याकडे लक्ष न देता माझे काम करत राहणार, असेही डॅा.होळी यावेळी म्हणाले.

प्रेस क्लबमध्ये घेतलेल्या या पत्रकार परिषदेला भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, किसान आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष रमेश भुरसे, जिल्हा महामंत्री रविंद्र ओल्लालवार, योगिता पिपरे, युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष अनिल तिडके यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या ६२ वर्षात या भागात जेवढा निधी मिळाला नाही तेवढा आपण ९ वर्षात खेचून आणला, असाही दावा डॅा.होळी यांनी केला. यावेळी त्यांनी जलसिंचन प्रकल्प, क्रीडांगण, कोनसरी लोहप्रकल्प, गडचिरोलीतील रखडलेली भूमिगत गटार योजना अशा अनेक क्षेत्रात केलेल्या आणि होत असलेल्या कामांची माहिती यावेळी दिली. मेडिकल कॅालेजमुळे प्रस्तावित मल्टिस्पेशालिटी हॅास्पिटल रद्द झाले असून पुढील वर्षी मेडिकल कॅालेज सुरू होईल, असा दावाही त्यांनी केला.