गडचिरोली : वडिलोपार्जित शेताकडे जाणाऱ्या वहीवाटीच्या रस्त्यासाठी न्याय मिळावा, तसेच ट्रॅक्टर व शेतीची अवजारे ने-आण करण्यासाठी सुकर मार्ग उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी गडचिरोली येथील गोकुळनगरातील रहिवासी मुकुंदा नारायण उंदिरवाडे यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देत उपोषण सुरू केले होते. तीव्र ऊन आणि उपोषणामुळे अशक्तपणा येऊन उंदिरवाडे यांची प्रकृती खालावली होती. त्यांना चक्कर येणे, रक्तदाब वाढणे अशी लक्षणे जाणवू लागल्याने तातडीने त्यांना गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दरम्यान माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ.अशोक नेते यांनी रुग्णालयात जाऊन उंदिरवाडे यांची भेट घेऊन त्यांना दिलासा दिला. डॉक्टरांकडून उपचारांची खातरजमा केली. रुग्णाला योग्य व तत्पर वैद्यकीय सेवा मिळत असल्याची खात्री करून त्यांनी कुटुंबीयांना धीर दिला.
यावेळी डॉ.नेते यांनी रुग्णालयातील इतर वॉर्डमध्येही जाऊन सर्वसामान्य रुग्णांची भेट घेऊन “डॉक्टर नियमित तपासणी करतात का?”, “औषधे वेळेवर मिळतात का?”, “जेवणाची सोय व्यवस्थित आहे का?” अशा विविध प्रश्नांच्या माध्यमातून प्रत्यक्ष रुग्णांशी संवाद साधत आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला.
रुग्णालयातील सुविधा, स्वच्छता, औषधपुरवठा व वैद्यकीय सेवेची गुणवत्ता याबाबतही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून आवश्यक सूचना दिल्या. या भेटीद्वारे डॉ.नेते यांनी रुग्णसेवेबाबतची आपली संवेदनशीलता व जनतेप्रती असलेली बांधिलकी पुन्हा एकदा अधोरेखित केली.
































