Home दैनंदिन बातम्या राज्य प्राणी शेकरूंची शिकार करणाऱ्या 12 जणांना अटक

राज्य प्राणी शेकरूंची शिकार करणाऱ्या 12 जणांना अटक

आलापल्ली वनपरिक्षेत्रातील कारवाई

जप्त केलेल्या प्राणी-पक्षांच्या अवयवांसह आरोपी आणि कारवाई करणारे पथक

आलापल्ली : राज्य प्राण्याचा दर्जा देण्यात आलेल्या आणि दुर्मिळ वन्यजीव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चार शेकरूंची, तसेच एका उडणाऱ्या खारीसह हरीयाल पक्षी, घुबड प्रजातीमधील पक्षाची शिकार करणाऱ्या 12 शिकाऱ्यांना वनविभागाच्या आलापल्ली वनपरिक्षेत्राच्या पथकाने मोठ्या शिताफीने पाठलाग करून पकडले. त्यांच्याकडून वन्यजीवांचे अवयव आणि शिकारीसाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आले.

आलापल्ली वनपरिक्षेत्रात सामूहिक जंगल गस्तीदरम्यान ही मोठी कारवाई करण्यात आली. सर्व आरोपींवर रात्री भारतीय वन अधिनियम 1927, तसेच वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत गुन्हे नोंदविण्यात आले.

प्राप्त माहितीनुसार, दि.19 एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास जंगलात काही जण शिकारीसाठी लपून बसल्याची माहिती वनविभागाला मिळाली होती. त्यानंतर गस्ती पथकाने तत्काळ त्या परिसरात सापळा रचून पाठलाग केल्यानंतर 12 जणांना ताब्यात घेण्यात आले. या कारवाईत शिकाऱ्यांकडून विविध वन्यजीवांचे अवशेष जप्त करण्यात आले.

सदर कारवाई आलापल्लीच्या उपवनसंरक्षक दीपाली तलमले व उपविभागीय वनअधिकारी शिवपाल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी गौरव गणवीर यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या मोहिमेत क्षेत्र सहाय्यक पुन्नमचंद बुधवार, वनरक्षक दत्ता सुरवसे, निलेश टेकाम, सुधाकर सोयाम, वाहन चालक सुरेश मडावी, चौकीदार श्याम जंगमवार, नामाजी मडावी व देवाजी सलामे आदी सहभागी झाले होते.

वन्यजीव संरक्षणाच्या दृष्टीने अशा प्रकारच्या अवैध कृत्यांवर वनविभागाचे सतत लक्ष असून पुढील काळातही कारवाया अधिक तीव्र करण्यात येणार आहेत. संशयास्पद हालचालींबाबत नागरिकांनी तात्काळ वनविभागास माहिती देण्याचे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी गौरव गणवीर यांनी केले आहे.