Home क्राईम शेकरूंसह वन्यजीवांची शिकार करणाऱ्यांकडून हत्यार, वाहने जप्त

शेकरूंसह वन्यजीवांची शिकार करणाऱ्यांकडून हत्यार, वाहने जप्त

आरोपींना दोन दिवसांची वनकोठडी

आलापल्ली : मौल्यवान वनस्पती आणि जैवविविधतेसाठी प्रसिद्ध असलेल्या आलापल्लीच्या जंगलातील नेंडर नियतक्षेत्रात गस्तीदरम्यान वन्यजीवांच्या शिकारीचा प्रकार उघडकीस आला. शिकाऱ्यांच्या टोळीतील 11 जणांना रंगेहात ताब्यात घेतल्यानंतर त्यांना चामोर्शीच्या प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांनी दोन दिवसांची वनकोठडी दिली. दरम्यान शिकारीसाठी वापरलेली हत्यारे, साहित्य आणि 5 दुचाकी वाहनेही वनविभागाच्या पथकाने जप्त केली आहेत.

वनविभागाच्या सतर्कतेमुळे शिकाऱ्यांकडून राज्य प्राण्याचा दर्जा असलेले चार मृत शेकरू, उडणारी मोठी खार (दोन्ही शेड्युल 1 मधील) तसेच राज्य पक्षी हरीयाल, आणि घुबड प्रजातीमधील मॅगपाय रॅाबिन यांची शिकार केल्याचे उघड झाले. त्यामुळे 11 जणांवर वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 नुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली.

वन कोठडीतील सर्व आरोपींची कसून चौकशी सुरू असल्याचे उपविभागीय वनअधिकारी शिशुपाल पवार यांनी सांगितले. या कारवाईत गडचिरोली वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक जी.पी. नरवणे, आलापल्ली वनविभागाच्या उपवनसंरक्षक दीपाली तलमले यांचे मार्गदर्शन, तर आलापल्लीचे वनपरिक्षेत्राधिकारी गौरव गणवीर आणि परिक्षेत्रातील क्षेत्रीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तपासात मोलाची कामगिरी बजावली.

अशी आहेत आरोपींची नावे

या गुन्ह्यात अटकेत असलेल्या आरोपींमध्ये सुनील किशन नरोटी, रामा घिस्सा धुर्वा, बबलू दानू आतलामी, नागेश टेकरा हिचामी, देसू मुन्सी गावडे, सेनू गोंगलू नरोटी, बालाजी तोंदे पद्दा, चेंदू गिस्सा धुर्वा, रमेश चैता आतलामी, विलास दानू आतलामी, बंडू फकरी तलांडी सर्व रा.उडेरा, ता.एटापल्ली यांचा समावेश आहे.

शिकारीचे प्रकार घडल्यास माहिती द्या

कोणताही वन्यू पशू अथवा पक्षी पाळणे, विकणे, खरेदी करणे, त्यांची शिकार करणे किंवा त्यांचे अवयव बाळगणे हा वन्यजीव संरक्षण अधिनियम, 1972 नुसार कायदेशिर गुन्हा आहे. असे प्रकार निदर्शनास आल्यास तत्काळ 1926 या टोल फ्री क्रमांकावर किंवा आलापल्ली वनविभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन उपवनसंरक्षक दीपाली तलमले यांनी केले आहे.