गडचिरोली : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून मोठा लाभ मिळण्याचे आमिष दाखवत गडचिरोलीतील दोघांना तब्बल 65 लाख रुपयांनी गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ‘टोटॅम-इन’ आणि ‘अल्ट्रापेक्स प्रो ॲप’ या अॅपच्या माध्यमातून ही फसवणूक झाली आहे. याप्रकरणी गडचिरोली पोलिसांनी अनोळखी आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस सूत्रानुसार, गडचिरोलीच्या माडेतुकूम भागात राहणारे कर सल्लागार रूपेश पुंडलिक भुरसे यांना 6 आॅक्टोबर 2025 रोजी एका अनोळखी सायबर भामट्याने मॅसेज करून शेअर बाजारात गुंतवणुकीतून मोठा लाभ मिळवून देण्याचे आमिष दाखवत ‘टोटॅम-इन’ हे ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले. भुरसे यांनी सुरूवातीला थोडी गुंतवणूक केली. त्यात त्यांना नफा मिळाल्याने त्यांचा विश्वास बसला. यानंतर कस्तुरी स्टिल कंपनीत गुंतवणुकीच्या नावाखाली भुरसे यांनी 21 लाखांची गुंतवणूक केली. पण नंतर त्यांना काहीच लाभ होत नसल्याचे दिसल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
याच पद्धतीने दत्तू कळमकर यांचीही फसवणूक झाली. त्यांच्याशी बंगळुरू येथील अनया अग्रवाल या नावाने एका महिलेने टेलिग्राम ॲपच्या माध्यमातून संपर्क केला. मार्च 2026 पासून त्या व्यक्तिने कळमकर यांच्याशी वारंवार संपर्क करून त्यांचा विश्वास निर्माण केला. त्यामुळे कळमकर यांनी त्या महिलेच्या सांगण्यावरून अल्ट्रापेक्स प्रो अॅपमध्ये टप्प्याटप्प्याने 44 लाख रुपयांची गुंतवणूक केली. त्यांना त्यात 60 लाखांचा नफा दिसत होता. परंतू प्रत्यक्षात रक्कम काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांचे अकाऊंट ब्लॅाक करण्यात आले. यानंतर 20 टक्के दंड भरल्यास सर्व पैसे परत मिळतील असे सांगून आणखी पैसे उकळण्याचा प्रयत्न झाला. अखेर कळमकर यांनीही पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली.
या दोन्ही प्रकरणांत एकूण 65 लाखांनी फसवणूक झाली आहे. अशा पद्धतीने आणखी काही लोकांची फसवणूक झाली असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणांचा तपास सायबर शाखेच्या मदतीने सुरू आहे.
































