धानोरा : रेती नेण्यासाठी धानोरा राजोली येथे आलेल्या नागपूरच्या टिप्परवरील चालक आणि सहायकात (क्लिनर) वाद झाला. मद्याच्या धुंदीत हा वाद विकोपाला जाऊन चालकाने त्याच्या सहायकाचा गळा आवळून खून केला. हा गुन्हा उघडकीस येऊ नये म्हणून त्याने मृतदेह शेतातील झाडावर लपवून पळ काढल्याचे सांगितले जाते. या घटनेत मार्कस सुनील मेश्राम (रा.तिरखुडा, ता.उमरेड, जि.नागपूर) या युवकाचा मृत्यू झाला तर विशाल प्रदीप महाकाळकर (रा.नागपूर) असे फरार चालकाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, वरील दोघे नागपूर येथून टिप्पर (एमएच 40, सीटी 5100) घेऊन रेती नेण्यासाठी राजोली येथे आले होते. दि.14 ला संध्याकाळी नंतर रेती भरतो असे सांगून त्यांनी टिप्पर काही अंतरावर उभा केला आणि ते मद्यपान करण्यासाठी बसले. मद्याची धुंदी चढल्यानंतर त्यांच्यात कोणत्यातरी कारणावरून वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि त्यातच विशाल याने मार्कस याचा गळा आवळून खून केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. यानंतर घाबरलेल्या विशालने आपले हे कृत्य उघडकीस येऊ नये म्हणून मार्कसचा मृतदेह जळवच्या शेतातील झाडावर लपवून ठेवून तेथून पळ काढला. विशेष म्हणजे आरोपी आणि मृत युवक हे जेमतेम 18 ते 19 वर्षाचे आहेत.
बुधवारी सकाळी 11 च्या सुमारास झाडावरून झुडूपांमध्ये पडलेला मृतदेह शेतकऱ्याला दिसला. धानोरा पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांना सुपूर्द केला.
































