गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी, तसेच आगामी काळात जिल्हा ‘स्टील हब’ म्हणून विकसित करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पावले उचलण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा उद्योग केंद्र, गडचिरोली यांच्या वतीने जिल्हा उद्योग मित्र समिती व इतर समन्वय समितीची संयुक्त बैठक आज, दि.17 जुलै रोजी दुपारी 1.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील उद्योगांना चालना देणे, नवउद्योजकांना शासकीय योजनांची माहिती व मार्गदर्शन उपलब्ध करून देणे, उद्योग क्षेत्रातील अडचणी सोडविणे आणि भविष्यातील औद्योगिक विकासाचा प्रभावी रोडमॅप तयार करणे, हा या बैठकीचा प्रमुख उद्देश आहे. विशेषतः गडचिरोलीमध्ये उभारणी होत असलेल्या मोठ्या औद्योगिक प्रकल्पांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक उद्योगांना पूरक संधी निर्माण करणे, ॲन्सिलरी उद्योगांचा विकास आणि स्थानिक युवकांसाठी रोजगारनिर्मिती यावर बैठकीत विशेष भर दिला जाणार आहे.
या बैठकीत जिल्ह्यातील उद्योग क्षेत्राच्या विकासासंदर्भातील विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात येणार असून, उद्योजकांच्या अडी-अडचणी, सूचना आणि अपेक्षा जाणून घेतल्या जाणार आहेत. तसेच उद्योग उभारणीसाठी उपलब्ध असलेल्या विविध शासकीय योजना, बँक कर्ज सुविधा, औद्योगिक गुंतवणुकीच्या संधी आणि विविध विभागांमधील समन्वयातून उद्योगांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.
यावेळी जिल्ह्यातील विद्यमान उद्योगांच्या समस्या व त्यावरील उपाययोजना, आगामी उद्योगविषयक कार्यक्रमांचे नियोजन, ॲन्सिलरी डेव्हलपमेंट रोडमॅप, ॲडव्हान्टेज विदर्भ अभियानाअंतर्गत उपलब्ध संधी, आजारी उद्योगांचे पुनरुज्जीवन, स्थानिक नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देण्याबाबतचा आढावा, तसेच जिल्हा निर्यात प्रचालन समितीची सभा यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा होणार आहे.
जिल्ह्यातील सर्व सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (MSME), संभाव्य उद्योजक, महिला उद्योजक, स्टार्टअप्स, उद्योग संघटना तसेच उद्योग क्षेत्राशी संबंधित सर्व घटकांनी या बैठकीस मोठ्या संख्येने उपस्थित राहून उपलब्ध होणाऱ्या मार्गदर्शनाचा व संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापकांनी केले आहे.
































