Home क्राईम अवैध दारु व चारचाकी वाहनासह 5 लाख 98 हजारांचा मुद्देमाल जप्त

अवैध दारु व चारचाकी वाहनासह 5 लाख 98 हजारांचा मुद्देमाल जप्त

स्थानिक गुन्हे शाखेची रेपनपल्लीत कारवाई

गडचिरोली : जिल्ह्रात दारुबंदी असताना अवैधरित्या दारुची विक्री व वाहतूक करण्याचा प्रयत्न स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हाणून पाडला. उपपोस्टे रेपनपल्लीच्या सहकार्याने सापळा रचून केलेल्या कारवाईत रेपनपल्ली परिसरातील चिल्लर दारू विक्रेत्यांना देशी-विदेशी दारूचा पुरवठा करणाऱ्या वाहनाला पोलिसांनी पकडले. या कारवाईत दारूसह एकूण 5 लाख 98 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना गोपनिय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार, संदीप गुराल्ला व त्याचा साथीदार सुरेंदर भुक्या हे पांढ­ऱ्या रंगाच्या फोर्ड ईको स्पोर्ट्स या चारचाकी वाहनाने चिल्लर दारु विक्रेत्यांना विदेशी दारुचा पुरवठा करणार होते. मिळालेल्या टिपच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा गडचिरोली व उपपोस्टे रेपनपल्ली येथील पोलीस पथकाने रेपनपल्ली येथे सापळा रचला असता, डीएल 2, एफबीपी 0045 हे वाहन संशयास्पदरित्या येताना दिसून आले. पोलीस पथकाने रस्त्यात तात्पुरता अडथळा निर्माण करून वाहन थांबवले.

पोलीस पथकाने पंचासमक्ष सदर वाहनाची तपासणी केली असता, व्हिस्की व बिअरचे खोके दिसून आले. आरोपी सुरेंदर शंकर भुक्या (नायक) आणि संदीप स्वामी गुराल्ला (दोघेही रा.मंचेरियल, तेलंगाणा) यांच्याविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला.

ही कारवाई पोलीस अधीक्षक एम.रमेश यांच्या आदेशान्वये अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राजजी, अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) हर्षवर्धन बी.जे., उपविभागीय पोलीस अधिकारी (जिमलगट्टा) राहुल मडावी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा गडचिरोली व उपपोस्टे रेपनपल्ली येथील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी पार पाडली.