
गडचिरोली : नीट पेपरफूट प्रकरणी राजधानी दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून गडचिरोलीत सलग दुसऱ्या दिवशी निदर्शने करण्यात आली. रविवारी निर्माण युवा संघटनेने धानोरा मार्गावर हॅाटेल वैभवसमोर निदर्शने करत एक दिवसाचा उपवास केल्यानंतर सोमवारी (दि.20) दुपारनंतर शहरातील इंदिरा गांधी चौकात सामाजिक-राजकीय संघटनांच्या पुढाकाराने विद्यार्थी रस्त्यावर उतरले.
या आंदोलनात काँग्रेस, माकप, शिवसेना उबाठा, आझाद समाज पक्ष, आदिवासी विकास परिषद, सत्यशोधक शिक्षक सभा अशा विविध पक्ष आणि संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सहभागी होऊन आंदोलकांना मार्गदर्शन केले. दरम्यान शेतकरी कामगार पक्षानेही राष्ट्रपतींच्या नावे निवेदन देऊन आपल्या भावना मांडत आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे.
दिल्ली येथील जंतर-मंतरवर सामाजिक कार्यकर्ते तथा शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचूक व अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाच्या समर्थनार्थ, तसेच केंद्र सरकारच्या तानाशाही प्रवृत्तीच्या निषेधार्थ हे एक दिवसीय लक्षवेधी धरणे आंदोलन आयोजित केले होते. जिल्ह्यातील युवक-युवती, विद्यार्थी, पालक आणि विविध सामाजिक-राजकीय संघटनांच्या प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने सहभागी होत सरकारच्या भूमिकेविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली.
आंदोलनाची सुरुवात भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकाचे सामूहिक वाचन करून करण्यात आली. त्यानंतर विविध वक्त्यांनी शिक्षण व्यवस्थेतील कथित अनियमितता, नीट पेपरफुट, बेरोजगारी, लोकशाहीवरील संकट आणि युवकांच्या भवितव्याबाबत सरकारवर टीका केली. यावेळी युवकांनी जोरदार नारेबाजीतून तीव्र नाराजीचा प्रत्यय दिला. आंदोलनादरम्यान पावसाने अचानक हजेरी लावली. मात्र, पावसाची पर्वा न करता युवकांनी आंदोलन सुरूच ठेवत घोषणाबाजी आणि निषेध कायम ठेवला. पोलिसांच्या कडक बंदोबस्तात हे आंदोलन शांततापूर्ण वातावरणात पार पडले.
यावेळी नीट पेपरफुटीच्या प्रकरणामुळे आत्महत्या केलेल्या 21 युवकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. जवळपास तीन तास चाललेल्या या आंदोलनात युवक-युवतींसह पालकांनीही उत्स्फूर्त सहभाग घेतला. अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या व्यथा, मागण्या आणि संताप फलकांवर लिहून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
आंदोलनस्थळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विश्वजित कोवासे, शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख पवन गेडाम, आझाद समाज पक्षाचे राज बन्सोड, भगतसिंग फाउंडेशनचे अध्यक्ष जावेद खान, ओबीसी युवा संघटनेच्या संतोषी सूत्रपवार, काँग्रेस आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रा.अनिल होळी, जंगोरायताड आदिवासी संघटना, महिला मैत्री संघ आदी संघटनांच्या प्रतिनिधींनी प्रत्यक्ष उपस्थित राहून आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला व आपले मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविक आजाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड यांनी केले. त्यांनी शिक्षणातील पारदर्शकता, लोकशाही मूल्यांचे संरक्षण आणि युवकांच्या भविष्याच्या प्रश्नांवर संघर्ष अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला. आभार प्रदर्शन ओबीसी युवा संघटनेच्या संतोषी सूत्रपवार यांनी केले. कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला.
आंदोलनात विवेक खोब्रागडे, अमोल मारकवार, जी. के. बारसिंगे, शीतल नरवडे, सोनाशी लभाने, ईश्वरी काळे, डॉ.शिल्पा आठवले, डॉ.प्रशांत सातार, प्रतीक डांगे, सतीश कुसराम, प्रितेश अंबादे, गणेश वरखडे, दिवाकर साखरे, नागसेन खोब्रागडे, डॉ.उज्वला सहारे, प्रकाश बन्सोड, नितीन वेस्कडे, विश्वरत्न युथ फउंडेशनचे वृषभ रामटेके, साहिल बोदेले, प्रतीक खोब्रागडे, मोनल सहारे, प्रियांक काळे, यश गलगट, आदिनाथ जाधव यांच्यासह शेकडो युवक-युवतींनी सहभाग घेतला.
हुकुमशाही सरकारला बरखास्त करा : शेकाप

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार विद्यार्थी आणि सामान्य जनतेला न्याय देण्यासाठी अपयशी ठरले असून मोदी सरकारला तातडीने बरखास्त करावे, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाने राष्ट्रपतींकडे केली आहे.
शेतकरी कामगार पक्षाच्या आदिवासी, भटके विमुक्त आघाडीचे प्रदेशाध्यक्ष रामदास जराते यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी आशिष वानखेडे यांच्यामार्फत राष्ट्रपतींकडे पाठविलेल्या निवेदनात, देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने हुकूमशाही पद्धतीने कारभार सुरू केला आहे, सरकारातील सर्व मंत्री केवळ अदानी-अंबानी यांच्यासाठी काम करत असून देशातील सामान्य जनतेच्या हक्क व अधिकारांची पायमल्ली करत मनमानी कारभार करत असल्याचा आरोप करण्यात आला.
या मनमानी कारभाराचा परिणाम म्हणून देशभरात महत्वाच्या परिक्षांचे पेपर फोडले जात आहेत. यामुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झालेला असताना सरकार जबाबदारी स्विकारायला तयार नाही. याविरोधात युवकांची चळवळ असलेल्या काॅक्रोच जनता पार्टी आणि इतर युवक संघटनांनी दिल्लीत शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन सुरू केले असताना सरकारने कोणतीही चर्चा न करता शास्त्रज्ञ सोनम वांगचूक यांनी सुरू केलेले आमरण उपोषण बळजबरीने संपविण्याचा प्रयत्न केला आहे, असा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे.
शास्त्रज्ञ सोनम वांगचूक आणि अभिजीत दिपके व इतर लाखो विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आमच्या पक्षाचा भक्कम पाठिंबा आहे. देशभरातील विद्यार्थी – तरुण आणि सामान्य जनतेचा सरकारविरोधातील रोष लक्षात घेऊन नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार तातडीने बरखास्त करा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली. निवेदन देताना शेतकरी कामगार पक्षाचे मध्यवर्ती समिती सदस्य शामसुंदर उराडे, जिल्हा समिती सदस्य डॉ.गुरुदास सेमस्कर, डंबाजी भोयर, महिला नेत्या जयश्री वेळदा, चंद्रकांत भोयर, योगेश चापले, कविता मेश्राम, संगिता चांदेकर, पोर्णिमा कांबळे, सोनाली कवडो प्रामुख्याने उपस्थित होते.
































