देसाईगंज : नीट पेपरफूट प्रकरण, विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज आणि राहुल गांधी तसेच प्रियंका गांधी यांच्यावर झालेल्या कारवाईच्या निषेधार्थ शुक्रवारी देसाईगंज येथे काँग्रेसच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी आमदार रामदास मसराम यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पोलिसांनी आपल्या वाहनातून पोलीस ठाण्यात नेऊन स्थानबद्ध केल्यानंतर हे आंदोलन थांबले.
काँग्रेसच्या वतीने आयोजित या निषेध आंदोलनाला मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. रेल्वे बोगद्याजवळील टी-पॅाईंटवर आमदार रामदास मसराम यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात पेपरफुट प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी, विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जचा निषेध, तसेच राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईच्या विरोधात केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
या आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी देसाईगंज शहरात पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आंदोलनानंतर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी सर्व आंदोलनकर्त्यांना आपल्या वाहनातून देसाईगंज पोलीस ठाण्यात नेले.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड.विश्वजित कोवासे, माजी जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.
































