Home पब्लिक प्रॉब्लेम उद्दिष्ट संपल्याचे सांगत धान खरेदी बंद, शेतकऱ्यांचा हायवेवर ठिय्या

उद्दिष्ट संपल्याचे सांगत धान खरेदी बंद, शेतकऱ्यांचा हायवेवर ठिय्या

आश्वासनानंतर 'रास्ता रोको' मागे

महामार्गावर ठिय्या आंदोलन करताना शेतकरी

सिरोंचा : आदिवासी विविध कार्यकारी सोसायटीमार्फत शेतकऱ्यांकडील धानाची खरेदी करण्यासाठी सुरू केलेले केंद्र उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे आणि मुदत संपल्याचे सांगत अर्ध्यातच बंद करण्यात आले. त्यामुळे संतापलेल्या सिरोंचा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शुक्रवारी (दि.24) सकाळी सिरोंचा – आसरअली या राष्ट्रीय महामार्ग क्र.63 वरील पेंटीपाका बस स्टॉपजवळ रास्ता रोको आंदोलन केले. सकाळी 7 वाजल्यापासून सुरू झालेल्या या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.

पेंटीपाका खरेदी केंद्रावर 365 शेतकऱ्यांनी धान विक्री करण्यासाठी नोंदणी केली. पण त्यापैकी जवळपास 200 शेतकऱ्यांचा धान खरेदी केल्यानंतर मुदत संपल्याचे आणि उद्दीष्ट संपल्याचे सांगत हे केंद्र बंद करण्यात आले. विशेष म्हणजे धान खरेदीसाठी गोदामे उपलब्ध नसल्याने आधीच ही खरेदी उशिरा सुरू करण्यात आली. त्यामुळे धान खरेदीची मुदत वाढवून द्यावी आणि खरेदीचे उद्दिष्ट वाढवून द्यावे. कारण जर हमीभाव खरेदी योजना शेतकऱ्यांसाठी आहे तर नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांचे धान खरेदी करणे शासनाची जबाबदारी नाही का? असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला.

धान खरेदी सुरू करण्यासाठी अनेक वेळा अर्ज, निवेदने आणि पाठपुरावा करूनही प्रशासनाने कोणतीही ठोस कार्यवाही केली नसल्याचा आरोप शेतकरी किसान आघाडी व आंदोलन समितीने केला. अखेर शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून राष्ट्रीय महामार्गावरच ठिय्या आंदोलन सुरू केले.

प्रशासकीय यंत्रणेची धावपळ

या आंदोलनाची माहिती मिळताच सिरोंचाचे नायब तहसीलदार पारधी, नगर पंचायतचे मुख्याधिकारी तथा नायब तहसीलदार सिडाम आणि महसूल विभागाचे अधिकारी-कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी मनोज डहारे तसेच आदिवासी विकास महामंडळाच्या अहेरी कार्यालयाचे उपप्रादेशिक व्यवस्थापक सदानंद राजुरे यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधून शेतकऱ्यांशी चर्चा घडवून आणली. यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मंत्रालयस्तरावर पाठपुरावा करून धान खरेदीचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. या आश्वासनाची अंमलबजावणी न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशारा शेतकरी आंदोलन समितीने दिला.

या आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सिरोंचाचे प्रभारी पोलीस अधिकारी मारुती नांदे यांच्या नेतृत्वाखाली मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

सिरोंचा तालुक्यातील 90 टक्के नागरिक शेतीवर अवलंबून असून धान हे प्रमुख पीक आहे. अशात धान खरेदी रखडल्याने हजारो शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. आता शासन धान खरेदीचा प्रश्न किती लवकर सोडवते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.