गडचिरोली : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम-2026 अंतर्गत 1 ऑक्टोबर 2026 या अर्हता दिनांकावर आधारित गडचिरोली जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी सोमवार, दि.31 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आली. त्यात जिल्ह्यातील एकूण 7 लाख 38 हजार 301 मतदारांचा समावेश आहे. याशिवाय अनुपस्थित, स्थलांतरित, मृत किंवा अन्य कारणांमुळे वर्गीकृत मतदारांची संख्या 90 हजार 616 आढळली आहे. ही नावे अंतिम मतदार यादीतून वगळली जाणार आहेत. त्यामुळे या प्रारूप मतदार यादीवर कोणाला काही आक्षेप असेल, कोणता बदल करायचा असेल तर त्यासाठी 30 सप्टेंबर 2026 पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. या कालावधीत दावे व हरकती नोंदविता येणार आहेत.

प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अविश्यांत पंडा यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली. या बैठकीत उपस्थित राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना प्रारूप मतदार यादी उपलब्ध करून देण्यात आली. प्रारूप यादीनुसार जिल्ह्यात 3 लाख 72 हजार 878 पुरुष, 3 लाख 65 हजार 411 महिला आणि 12 तृतीयपंथी मतदार आहेत. याशिवाय 27,414 ‘अनमॅप्ड’, अर्थात जुळवणी न झालेले मतदार, तर 56,852 नोंदींमध्ये विसंगती आढळली आहे. संबंधित मतदारांना नोटीस देऊन सुनावणी घेतली जाणार आहे.
ही प्रारूप मतदार यादी मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कार्यालय देसाईगंज, गडचिरोली व अहेरी, तसेच जिल्ह्यातील सर्व सहायक मतदार नोंदणी अधिकारी कार्यालये, सर्व 973 मतदान केंद्रे आणि जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे प्रसिद्ध करण्यात आली आहे.
दावे व हरकतींच्या कालावधीत नोंदींमध्ये विसंगती असलेले, तसेच पूर्वीच्या नोंदीशी जुळवणी न झालेले मतदार यांना सुनावणीची संधी देण्यात येणार आहे. यासाठी ECI NET पोर्टलवरून संबंधित मतदारांसाठीची नोटीस ऑटो जनरेट होणार आहे. मतदार नोंदणी अधिकारी त्यावर सुनावणीची तारीख व ठिकाण नमूद करून संबंधित मतदारांना नोटीस उपलब्ध करून देतील.
संपर्क होऊ न शकलेल्या मतदारांची अद्ययावत यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. दावे व हरकतींच्या कालावधीत ज्या मतदारांना सुनावणीसाठी नोटीस प्राप्त झाली आहे, त्यांनी निर्धारित दिवशी आवश्यक कागदपत्रांसह सुनावणीस उपस्थित राहून निवडणूक प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल जाधव यांनी केले आहे.
































