
गडचिरोली : आपले कर्तव्य बजावत असताना वीरगती पत्करणाऱ्या वीर पोलीस जवानांची आठवण म्हणून संपूर्ण देशभर पोलीस प्रशासनातर्फे 21 ऑक्टोबर हा दिवस हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो. गडचिरोलीत पोलीस स्मृती दिनाचे औचित्य साधत शहीदांच्या कुटुंबियांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन केले होते. याशिवाय पोलीस अधीक्षक एम.रमेश यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शहीदांच्या घरी भेट देत कुटुंबियांशी संवाद साधून त्यांच्या त्यागाप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी आणि नागरिकांच्या संरक्षणासाठी कर्तव्य बजावताना आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शूर पोलीस अधिकारी व अंमलदारांच्या शौर्याचे स्मरण करण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलीस स्मृती दिनाचे आयोजन केले होते. यासोबतच पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्या संकल्पनेतून मुख्यालयातील एकलव्य हॉल, तसेच उपमुख्यालय प्राणहिता येथे शहीद कुटुंबिय सन्मान सोहळ्याचे आयोजन केले होते.
या कार्यक्रमाला माओवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांचे कुटुंबिय उपस्थित होते. यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी शहीदांच्या कुटुंबियांशी संवाद साधून त्यांच्या भावना जाणून घेतल्या. या सोहळ्यादरम्यान वरिष्ठ अधिकायांनी शहीदांच्या कुटुंबियांची आस्थेने विचारपूस करून त्यांच्या अडचणी व समस्या जाणून घेतल्या. तसेच सर्व शहीद कुटुंबातील सदस्यांना स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र व भेटवस्तू देण्यात आल्या.
पोलिसांच्या शौर्यामुळे जिल्हा माओवादमुक्त
पोलीस अधीक्षक एम.रमेश यांच्यासह वरिष्ठ अधिकायांनी जिल्ह्रातील पोस्टे / उपपोस्टे / पोमकें हद्दीत राहत असलेल्या सर्व शहीद कुटुंबियांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन कृतज्ञता व्यक्त केली. याप्रसंगी मार्गदर्शन करताना पोलीस अधीक्षक एम.रमेश म्हणाले, शहीदांचे स्मरण करणे, त्यांच्या कुटुंबियांप्रती आदर व्यक्त करणे आणि त्यांच्या त्यागाची जाणीव समाजात कायम ठेवणे, हाच पोलीस स्मृती दिनाचा खरा संदेश आहे. कर्तव्य बजावताना सर्वोच्च बलिदान देणाऱ्या पोलीस अधिकारी व अंमलदारांचे योगदान सदैव प्रेरणादायी राहिले आहे. त्यांच्या शौर्यामुळे आणि समर्पणामुळे आज गडचिरोली जिल्हा माओवादापासून मुक्त झाला असून, जिल्हा विकासाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. शहीद जवानांचे बलिदान केवळ पोलीस दलासाठीच नव्हे, तर संपूर्ण समाजासाठी अभिमानाची बाब आहे. यासोबतच शहीद कुटंुबीयांच्या पाठीशी गडचिरोली पोलीस दल सदैव खंबीरपणे उभे असून, त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणे आणि त्यांना आवश्यक ते सहकार्य करणे ही पोलीस दलाची जबाबदारी आहे.
या कार्यक्रमामध्ये अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी, अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) हर्षवर्धन बी.जे., प्रभारी सहा.पोलीस अधीक्षक (गडचिरोली) सुयशकुमार सिंग, पोलीस उपअधीक्षक (अभियान) सुनील ऊईके प्रामुख्याने उपस्थित होते.
































