कुरखेडा : आजच्या धकाधकीच्या जीवनात समाजमन सुदृढ ठेवण्यासाठी धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची नितांत आवश्यकता आहे. अशा उत्सवांच्या माध्यमातून समाजात चांगले आचार, सकारात्मक विचार आणि सुसंस्कारांची रुजवणूक होते. त्यामुळे प्रत्येकाने धार्मिक उत्सवांचे महत्त्व जाणून घेत त्यातून चांगले विचार व संस्कार आत्मसात करावेत, असे प्रतिपादन गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ.अशोक नेते यांनी केले.
कुरखेडा येथील शास्त्री चौक (गांधी वार्ड) सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळ, तसेच शिरपूर येथील सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने आयोजित दुर्गोत्सव व गोपाळकाला कार्यक्रमात डॉ.अशोक नेते सहभागी झाले असताना त्यांनी मार्गदर्शन केले.यावेळी त्यांनी पारंपरिक उत्साहात गोपाळकाला फोडून दुर्गामातेचे दर्शन घेतले. तसेच उपस्थित नागरिकांच्या आनंदी जीवनासाठी प्रार्थना केली.
शिरपूरच्या गोपाळकाल्याच्या परंपरेशी जिव्हाळ्याचे नाते
शिरपूर येथील भाविकांशी संवाद साधताना मा.खा.डॉ.नेते म्हणाले की, शिरपूरच्या गोपाळकाला उत्सवाला दरवर्षी उपस्थित राहण्याचा माझा प्रयत्न असतो. येथील नागरिकांचे प्रेम, उत्सवातील उत्साह आणि दुर्गामातेप्रती असलेली श्रद्धा यामुळे या ठिकाणी येण्याचा आनंद वेगळाच असतो. दुर्गामातेच्या चरणी नतमस्तक होऊन या परिसरातील सर्व नागरिकांचे जीवन सुखी, समृद्ध आणि सुजलाम्-सुफलाम् व्हावे, अशी प्रार्थना मी करतो.
धार्मिक उत्सव हे केवळ श्रद्धेचे प्रतीक नसून समाजातील एकोपा, बंधुभाव आणि सांस्कृतिक परंपरा जपण्याचे प्रभावी माध्यम आहे. अशा कार्यक्रमांमुळे नव्या पिढीला आपल्या संस्कृतीची ओळख होते आणि समाजात सकारात्मकतेचे वातावरण निर्माण होते, असेही त्यांनी नमूद केले.
































