गडचिरोली : यावर्षीच्या पावसाळ्यात आतापर्यंतच्या पूरपरिस्थितीत शनिवारचा (दि.27) दिवस आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टिने सर्वात महत्वाचा ठरला. आधीच पूरस्थितीसदृश परिस्थिती असताना त्यात झालेल्या जोरदार पावसामुळे विविध ठिकाणी 93 जण अनपेक्षितपणे पुरात अडकले होते. पण जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने तत्परता दाखवत एसडीआरएफ, महसूल, पोलीस विभाग आणि आपदा मित्रांच्या मदतीने सर्वांना सुखरूप बाहेर काढले. यात रविवारी आयोजित पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी गडचिरोलीत येणाऱ्या भामरागड तालुक्यातील 29 जणांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे स्वत: आपत्ती व्यवस्थापन सल्लागार कृष्णा रेड्डी यांनीही तत्परतेने या रेस्क्यू आॅपरेशनमध्ये प्रत्यक्ष सहभाग घेऊन लोकांना वाचविण्यासाठी पुढाकार घेतला.
गडचिरोली तालुक्यातील मौजा चांदाळा गावानजिकच्या कुंभी नाल्याच्या पुरामुळे शेतात काम करायला गेलेले नागरिक अडकून पडले होते. याची माहिती मिळताच जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकाने एकूण 59 व्यक्तींना दोराच्या मदतीने वाहत्या पाण्यातून बाहेर काढले. यामध्ये एका अंध व्यक्तीचा सुद्धा समावेश होता.
मौजा कुंभी मोकासा येथून वैद्यकीय सुविधेची गरज असलेल्या दोन महिला आणि एका व्यक्तीला असे तिघांना नदीच्या पुरातून बोटीद्वारे सुखरूप काढून गडचिरोली मुख्यालयी पोहोचवून देण्यात आले. याशिवाय याच गावातील 6 बेरोजगार पुरामुळे गडचिरोलीत पोलिस भरतीच्या परीक्षेपासून वंचित राहण्याची शक्यता होती. ही बाब पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांना कळताच त्यांनी त्या बेरोजगारांची परीक्षेची संधी गमावल्या जाऊ नये म्हणून त्यांना पुरातून बाहेर काढण्याची सूचना आपत्ती व्यवस्थापन विभागाला केली. त्यामुळे त्या 6 परीक्षार्थींना राज्य आपत्ती प्रतिसाद पथक (एसडीआरएफ), आपत्कालीन पथक, महसूल व पोलिस पथकांच्या सहाय्याने सर्वाना बोटच्या सहाय्याने पुरातून बाहेर काढून वेळीच गडचिरोली मुख्यालयी पोहचविण्यास मदत केली. याच पद्धतीने मार्ग बंद असलेल्या भामरागड मुख्यालयातील 23 परीक्षार्थींना पुराच्या पाण्यातून बाहेर काढून गडचिरोलीत पोहोचण्यासाठी मदत करण्यात आली.
विशेष म्हणजे मौजा कुंभी मोकासा येथे जाण्याकरिता आपत्कालीन पथक, एसडीआरएफ, महसूल, पोलीस पथक, आपदा मित्र यांच्या सहकार्याने मोटार बोट जवळपास एक किलोमीटरपर्यंत खांद्यावर उचलून 3 नाले व नदी पार करून नागरिकांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले.
रात्री 9 वाजेपर्यंत सुरू होते बचाव कार्य
गडचिरोली तालुक्यातल्या मौजा रानमूल येथे पुराच्या पाण्यात 2 व्यक्ती वेढल्या गेले असल्याची माहिती संध्याकाळी मिळताच बचाव पथकाने तिकडे धाव घेतली. रात्रीच्या अंधारात पूरपरिस्थितीवर मात करत रात्री 8 वाजता आपात्कालीन पथक तिकडे पोहोचले आणि रात्री 9 वाजता त्यांना सुरक्षितरित्या पुराबाहेर काढून नवजीवन दिले. या सर्व कामात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन सल्लागार कृष्णा रेड्डी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नील तेलतुंबडे यांच्या मार्गदर्शनात बचाव पथकातील सदस्यांनी दाखविलेली तत्परता कौतुकाचा विषय झाली आहे.