कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांनी अखेर सुरू केले बेमुदत कामबंद आंदोलन

रिक्त पदांवर सामावून घेण्याची मागणी

गडचिरोली : राज्याच्या उर्जा मंत्रालयांतर्गत महावितरण, महानिर्मिती, महापारेषणमधील कंत्राटी कामगारांनी संयुक्त कृती समितीच्या नेतृत्वात विविध मागण्यांसाठी मंगळवारपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. एकीकडे तापमान वाढत असताना दुसरीकडे कर्मचाऱ्यांच्या संपामुळे वीज पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

तीनही कंपन्यांमध्ये मिळून राज्यभरात ४२ हजार कंत्राटी कर्मचारी आहेत. त्यांना वीज कंपन्यांतील रिक्त पदांवर सामावून घ्या, हे कंत्राटी कर्मचारी स्थायी होईपर्यंत तेथे नियमित पदभरती करू नका यासह इतरही मागण्या कर्मचाऱ्यांच्या आहेत. त्या मान्य होत नसल्याने हे कर्मचारी २८ आणि २९ फेब्रुवारीला संपावर होते. मागण्या मान्य न झाल्यामुळे त्यांनी ५ मार्चपासून बेमुदत संपाचा निर्णय घेतला.