तलावाच्या मातीसाठी आडवी खोदली नाली, पाण्यासोबत मासेही गेले वाहून

शेताचा मार्ग अडल्याने शेतकरी संतप्त

देसाईगंज : रेल्वेमार्गाच्या कामासाठी देसाईगंज तालुक्यातील कोंढाळाच्या बेलगाव तलावामधून आणि काही शेतांमधून माती काढण्यात आली. वडसा रेल्वेस्थानकापासून रेल्वेमार्गासाठी माती टाकून सपाटीकरण करण्यात आले. पण तलावातील पाणी काढण्यासाठी खोदलेल्या नालीतून सर्व पाणी वाहून गेल्याने मासेमारीवर संक्रांत आली आहे. शिवाय शेतात जाण्यासाठी रस्ताही राहिला नसल्यामुळे रेल्वेमार्गाच्या कंत्राटदाराविरूद्ध शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे.

काही दिवसाअगोदर कंत्राटदाराने तलाव उत्खनन करण्यासाठी ग्रामपंचायतकडून नाहरकत प्रमाणपत्र घेऊन माती काढली होती. गावापासून 5 किमी अंतरावर असलेल्या बेलगाव तलावात मासेमारी केली जाते. या निमित्ताने तलावाचे खोलीकरण होऊन जास्त पाणी साचून राहिले म्हणून ग्रामपंचायतने माती काढण्याची परवानगी दिली होती.

कंत्राटदाराने तलावात पाणी असल्याने तेथून ओव्हरफ्लो मधून मोठी नाली खोदून पाणी काढले आणि मातीचे उत्खनन केले. आता याच नालीमुळे शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. या परिसरात रबी हंगामात धानाचे पीक घेण्यात येते. यावेळी या परिसरातील 30 पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी शेतात धान लावला आहे. त्यांना आपल्या शेतात जाण्यासाठी पूर्वी याच परिसरातून येणे-जाणे करावे लागत होते. पण आपल्या फायद्यासाठी कंत्राटदाराने तलावाचे पाणी नालीव्दारे काढले आहे. परिणामी शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्ताच नसल्याने आता शेतात जायचे कुठून, ट्रॅक्टर न्यायचा कुठून, असे प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाले आहे.

नाली खोलीकरण जास्त प्रमाणात केल्याने तलावात पाणी न राहता ओव्हरफ्लोमधून पाणी आणि मासे वाहून गेले आहेत. शेतकऱ्यांना येणे-जाणे करण्यासाठी रस्ता सुरळीत करून द्यावा, अन्यथा शेतकऱ्यांना घेऊन आंदोलन करणार, असा इशारा माजी उपसभापती नितीन राऊत यांनी दिला आहे.