ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीकडे उमेदवारांनीच फिरविली पाठ

नामांकनाअभावी १३२ जागा राहणार रिक्त

गडचिरोली : जिल्ह्यात येत्या ५ नोव्हेंबर रोजी होऊ घातलेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणेची तयारी सुरू आहे. यात सार्वत्रिक निवडणुकीला बऱ्यापैकी प्रतिसाद असला तरी ७२ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीसाठी मात्र नामांकन भरण्यास उमेदवारच सरसावले नाहीत. त्यामुळे १३२ सदस्यांच्या जागा रिक्तच राहणार आहेत.

पोटनिवडणूक होऊ घातलेल्या ७२ ग्रामपंचायतींपैकी चामोर्शी तालुक्यातील २ आणि अहेरी तालुक्यातील १ अशा तीन ग्रामपंचायतींमध्ये एका जागेसाठी एकच नामांकन दाखल झाले. त्यामुळे त्या ठिकाणचे सदस्य अविरोध निवडल्या जातील. याशिवाय धानोरा तालुक्यातील २ सरपंचही बिनविरोध निवडल्या जाणार आहेत. पण सदस्यांच्या १३२ जागांसाठी कोणीच नामांकन भरलेले नाही.

सार्वत्रिक निवडणुकीतून १३ ग्रामपंचायती बाद

जिल्ह्यातील कोरची, गडचिरोली, धानोरा, एटापल्ली, भामरागड, अहेरी आणि सिरोंचा या ७ तालुक्यांमधील ३७ ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक निवडणूक लावण्यात आली होती. त्यापैकी गडचिरोली तालुक्यातील देवापूर ग्रामपंचायतमध्ये निवडणूक बिनविरोध झाली. उर्वरित ३६ पैकी १३ ग्रामपंचायतींमध्ये कोणी नामांकन भरले नाही. त्यामुळे आता २३ ग्रामपंचायतींमध्येच प्रत्यक्ष मतदान होणार आहे. त्यात सरपंचपदासाठी ८२ उमेदवार, तर सदस्यत्वासाठी ४५२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.