आरमोरी क्षेत्रातील समस्यांकडे आमदारांनी वेधले सभागृहाचे लक्ष

सिंचन सुविधांसह 12 तास वीज द्या

देसाईगंज : आपल्या आरमोरी मतदार संघासह गडचिरोली जिल्ह्यात शेतीशिवाय दुसरा उत्पन्नाचा स्थायी स्रोत नाही. त्यामुळे नद्यांमधून वाहून जाणारे पाणी अडवून त्याचा सिंचनाचा वापर करण्याची सोय व्हावी आणि शेतकऱ्यांना पूर्ण क्षमतेने 12 तास वीज पुरवठा द्यावा, अशी मागणी आमदार रामदास मसराम यांनी गुरूवारी संध्याकाळी विधिमंडळ सभागृहात केली.

यावेळी आ.मसराम यांनी आरमोरी विधानसभा मतदारसंघातील विविध प्रश्नांकडे सरकारने लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. विशेषतः पायाभूत सुविधेशी संबंधित समस्यांवर त्यांनी भर दिला. रानटी हत्तींमुळे पीकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याने त्या शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, रस्ते दुरूस्तीसाठी पुरेसा निधी द्यावा, शासकीय धान खरेदीचे प्रलंबित चुकारे द्यावे, धान खरेदीमधील घोटाळ्याची चौकशी करावी, शिक्षकांची रिक्त पदे भरावी याकडेही त्यांनी लक्ष वेधले.