अहेरी-सिरोंचा राष्ट्रीय महामार्गाच्या दुरूस्तीसाठी केला चार तास चक्काजाम

16 नोव्हेंबरपासून कामाला सुरूवात करणार?

अहेरी : अहेरी ते सिरोंचा या 353-सी राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे बुजवून या मार्गाची दुरूस्ती करावी, यासाठी गुरूवारी सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांच्या नेतृत्वात सकाळी 7 वाजतापासून रेपनपल्ली येथे महामार्गावर ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले. चार ते पाच तास वाहतूक ठप्प झाली होती.

यावेळी एसडीपीओ सुजित क्षिरसागर आणि पोलिस उपनिरीक्षक गोविंद खटीक यांनी ताटीकोंडावार व आंदोलक नागरिकांसोबत चर्चा करून संबंधित विभागासोबत समन्वय ठेवून येत्या 16 तारखेला काम सुरू होणार असल्याचे सांगितले. या कामाविषयी काही अडचणी आल्या तर आम्ही सहकार्य करू, असे आश्वासनही नागरिकांना दिले. त्यामुळे हे आंदोलन मागे घेण्यात आले.

अहेरी-सिरोंचा 353 सी या महामार्गाची दुरवस्था झाली असून मार्गावर मोठमोठे खड्डे कधी बुजविणार, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत होते. या रस्त्यावरून जाणाऱ्या अनेक गरोदर महिलांना रस्त्यातच प्रसुतीकळा सुरू होतात. तर काही रुग्णांचा वेळेत उपचार न मिळाल्याने मार्गातच जीव गेला आहे. अनेकांचे अपघात होऊन अपंगत्व आले आहे. याची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.