हे सांस्कृतिक भवन की उकिरडा? टाकाऊ कचऱ्याने सुटली दुर्गंधी

आरोग्य धोक्यात, आंदोलनाचा इशारा

देसाईगंज : शहराच्या नगर परिषद कार्यालयासमोरील जागेत नागरिकांच्या कराच्या उत्पन्नातून कोट्यवधी रुपये खर्च करून सांस्कृतिक भवन बांधण्यात आले आहे. मात्र सध्या या भवनाच्या परिसराला उकीरड्याचे रूप आले आहे. चक्क दुर्गंधीयुक्त कचरा तिथे फेकल्या जात असल्याने परिसरात दुर्गंधी सुटली आहे. मात्र डोळ्यापुढे घडणारा हा प्रकार नगर परिषद प्रशासनाला दिसत नाही का? असा सवाल नागरिकांना पडला आहे.

देसाईगंज शहरातील नागरिकांना सामाजिक, सांस्कृतिक, तसेच धार्मिक सोपस्कार पार पाडता यावेत याकरीता शहराच्या सर्व्हे नं.24/5 मध्ये 8 एकरात कोट्यवधी रुपये खर्च करून सांस्कृतिक भवन बांधण्यात आले आहे. या सांस्कृतिक भवनात विविध कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात येते. त्या अनुषंगाने जेवणाचे कार्यक्रमही होत असतात. मात्र अलिकडे हे सांस्कृतिक भवनाच्या परिसराला घाणेरडे रूप आले आहे. परिसरात तयार करण्यात आलेला बगीचा देखील देखभाल दुरुस्तीअभावी नामशेष झाला आहे.

सांस्कृतिक भवनात होणाऱ्या कार्यक्रमानंतर उरलेला टाकाऊ कचरा उचलुन डंपिंग यार्डमध्ये टाकण्यासाठी सफाई कामगार कार्यरत आहेत. पण भवनातील टाकाऊ कचरा सांस्कृतिक भवन परिसरातच टाकण्यात येत असल्याने त्या कुजलेल्या कचऱ्याला दुर्गंधी सुटून परिसरात उग्र वास पसरला आहे. यामुळे अनेकांना मोठा त्रास होऊन त्यांचे आरोग्य बिघडत आहे.

नगर प्रशासनाने येथील टाकाऊ कचरा तत्काळ उचलुन त्याची विल्हेवाट न लावल्यास नगर परिषद कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेसचे कार्यकर्ते पिंकू बावणे यांनी प्रशासनाला दिला आहे. याबाबत नगर प्रशासन काय कार्यवाही करते याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.