गडचिरोली : महाशिवरात्रीच्या यात्रेनिमित्त मार्कंडादेव येथे चंद्रपूर जिल्ह्यातून येणाऱ्या भाविकांसाठी सावली तालुक्यातील साखरी (सिरशी) घाट हा एक जवळचा मार्ग असताना त्या ठिकाणी नदीपात्रात रपटा नसल्यामुळे भाविकांसाठी अडचण निर्माण झाली होती. पण मा.खा.अशोक नेते यांनी ही बाब चंद्रपूरचे कार्यकारी अभियंता विवेक पेंडे यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानुसार तातडीने नदीपात्रात तात्पुरता रपटा बांधण्याचे काम हाती घेण्यात आले. त्यामुळे भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्कंडादेव या पौराणिक आणि शिल्पकलेने नटलेल्या शिवमंदिराला अध्यात्मिक आणि धार्मिक वारसा लाभलेला आहे. दरवर्षी महाशिवरात्रीच्या निमित्ताने लाखो भाविक दर्शनासाठी येतात. मात्र, नदीच्या पात्रातून पाणी वाहत असल्याने चंद्रपूर जिल्ह्याकडू येणाऱ्या भाविकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. दरवर्षी त्या ठिकाणी तात्पुरता रपटा बांधला जातो. पण यावर्षी महाशिवरात्री दोन-तीन दिवसावर आली असताना ही सोय झालेली नव्हती. भाजपचे सावली तालुका कोषाध्यक्ष किशोर वाकुडकर यांनी ही अडचण मा.खा.अशोक नेते यांना सांगितली. नेते यांनी लगेच चंद्रपूरचे कार्यकारी अभियंता विवेक पेंडे यांच्याशी संपर्क साधून नदीच्यापात्रात तात्पुरता रपटा उभारण्याची मागणी केली. त्यांच्या मागणीची दखल घेऊन पाण्याचा प्रवाह अडवण्यासाठी रेती भरलेल्या चुंगड्यांच्या साहाय्याने रपटा उभारण्याचे कार्य सुरू करण्यात आले. आज त्या रपट्याचे काम पूर्ण होईल. यामुळे कोणत्याही अडथळ्याशिवाय भाविकांना साखरीघाट मार्गे मार्कंडादेवाच्या दर्शनासाठी जाता येणार आहे.
स्थानिक प्रशासन व नागरिकांचे मोलाचे योगदान
या महत्वपूर्ण कामासाठी उपअभियंता राजकुमार गेडाम, अभियंता साखरे, भाजपचे तालुका कोषाध्यक्ष किशोर वाकुडकर, ग्रामपंचायत सदस्य तसेच मा.खा.अशोक नेते यांचे सहाय्यक व सोशल मीडिया प्रमुख दिवाकर गेडाम, साखरीचे उपसरपंच रविंद्र गेडाम यांच्यासह स्थानिक नागरिकांनी मोलाचे सहकार्य केले. भाविकांच्या सोयीसाठी उभारलेल्या या रपट्यामुळे यात्रेचा उत्साह अधिक वाढला असून, भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.